पाटणा -बिहार विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या झडत आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांनी विद्यामान मुख्यमंत्री नितिश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. नितिश कुमार हे मुख्य 'मौका मंत्री' तर, सुशील मोदी हे उपमुख्य 'धोका मंत्री' आहेत, अशी टीका लालू यादव यांनी केली.
बिहार निवडणुकीवेळी कारागृहात असण्याची लालू प्रसाद यादव यांच्या राजकीय कारकीर्दीतील ही पहिली वेळ आहे. मात्र, कारगृहातून ते विरोधी पक्षांना लक्ष्य करत आहेत. गुरुवारी लालू यादव यांनी टि्वट करून नितिश कुमार आणि सुशील मोदी यांच्यावर टीका केली. बिहारच्या जनतेने नितिश कुमार आणि सुशील मोदी यांना संधी दिली. मात्र, या दोन्ही नेत्यांनी जनतेचा विश्वासघात केला, असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे. तसेच त्यांनी एक व्यंगचित्र शेअर केले आहे. त्यामध्ये नितिश कुमार आणि सुशील मोदी मत मागताना दिसत आहेत.