पणजी- कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर यांना वर्षभरापूर्वी पक्षाघाताचा झटका आला होता. त्यामुळे ते काहीच हालचाल करत नव्हते. मात्र, अलिकडे सभागृहात उपस्थित राहत कामकाजात सहभाग घेत आहेत. सत्ताधारी भाजपचे आमदार असूनही जुने गोवे परिसरातील बायंगिणी येथे होणाऱ्या कचरा प्रकल्पाच्या उभारणीला त्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे वर्षभरानंतर सभागृहात त्यांचा आवाज घुमला.
गोवा विधानसभेत पावसाळी अधिवेशन सुरु आहे. त्यामध्ये शनिवारी मडकईकर यांनी बायंगिणी कचरा प्रकल्पासंदर्भात 'लक्ष्यवेधी' प्रश्न मांडला होता. मात्र, त्यांच्यावतीने मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी त्याचे वाचन केले. त्यांनंतर त्यावर चर्चा झाली. त्यामध्ये ते सहभागी झाले नव्हते. मात्र, त्यानंतर मांडण्यात आलेल्या आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याशी संबंधित खासगी ठरावाच्या निमित्ताने झालेल्या चर्चेत ते सहभागी झाले.