रायपूर - छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातील एका बीट गार्डचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. कोणतीही परवानगी न घेता, बांबूची तोडणी करत असणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना या बीट गार्डने चांगलेच झापले आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही अधिकारी या बीट गार्डहून वरच्या पदावर कार्यरत आहेत. तरीही, नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या गार्डने त्यांना चांगलेच झापले आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विभागीय वन अधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शेखर असे या बीट गार्डचे नाव आहे. तर, अधिकाऱ्यांपैकी एक फॉरेस्ट रेंजर मृत्यूंजय सिंह आहे. कोणतीही परवानगी न घेता बांबूची तोडणी करत असल्यामुळे शेखरने केवळ या अधिकाऱ्यांना झापले नाही, तर त्यांच्यावर संबंधित कलमांतर्गत कारवाईचाही इशारा दिला. तेवढ्यावरच न थांबता शेखर यांनी याबाबत ११ कुऱ्हाडी आणि ३६५ नग बांबू जप्त केला. तसेच रेंजर, डेप्युटी रेंजर, दुसरा बीट गार्ड आणि ११ मजूरांविरोधात गुन्हाही दाखल केला होता.