महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

वाचा एका क्लिकवर : काय होणार आज दिवसभरात... - sonu sood hotel construction news

मुंबईतील कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी वापरण्यात येणारी सीरमची कोव्हिशिल्ड काही तासातच मुंबईत दाखल होत आहे. ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्‍वरांच्या यात्रेनिमित्ताने आज अक्षता सोहळा असणार आहे.

दिवसभरातील घडामोडी
दिवसभरातील घडामोडी

By

Published : Jan 13, 2021, 6:14 AM IST

Updated : Jan 13, 2021, 6:29 AM IST

नवी दिल्ली-देशाच्या आर्थिक राजधानीत आज लसींचा साठा पोहोचला आहे. दुसरीकडे लोकल सुरू करण्याबाबत राज्य सरकार आज न्यायालयात भूमिका स्पष्ट करणार आहे. दिवसभरात काय घडणार, याचा हा घेतलेला संक्षिप्त वेध आहे.

१. मुंबईत कोरोना लस दाखल

मुंबई -देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या मुंबईसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. मुंबईतील कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी वापरण्यात येणारी सीरमची कोव्हिशिल्ड काही तासातच मुंबईत दाखल होत आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून कोरोना लसचा साठा (कोव्हिशिल्ड) हा मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. ही लस काही तासात मुंबईच्या मनपा कार्यालयात दाखल होणार आहे. देशभरात लसीकरण सुरू होण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक आहेत. याअनुषंगाने पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधून लसीच्या वितरणाला सोमवारी रात्रीपासून सुरुवात झाली आहे.

२. राज्यपाल भंडारा दौऱ्यावर

मुंबई-भंडारामधील सरकारी रुग्णालयात लागलेल्या आगीत ९ जानेवारीला १० बालकांचे मृत्यू झाले. या रुग्णालयाला आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भेट देणार आहेत. या दुर्घटनेची चौकशी नेमण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. बालकांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरून दु:ख व्यक्त केले होते.

३. सिध्दरामेश्‍वरांच्या यात्रेनिमित्ताने आज अक्षता सोहळा

सोलापूर- ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्‍वरांच्या यात्रेनिमित्ताने आज अक्षता सोहळा असणार आहे. त्यानंतर 16 जानेवारीपर्यंत यात्रा चालणार आहे. कोरोनामुळे यात्रेचे मोठ्या प्रमाणात यात्रा न करता प्रतिकात्मक यात्रा साजरी होणार आहे. यात्रा काळात शहरात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यांवर वाहनांची पोलिसांकडून तपासणी केली जाणार आहे.

४. नाट्यपरिषदेच्या नियामक मंडळाची बैठक

मुंबई- नाट्यपरिषदेच्या नियामक मंडळाची बैठक आज आयोजित करण्यात आली आहे. गेल्या दहा महिन्यांपासून टाळेबंदीमुळे ही बैठक रखडली होती. यंदा होणारे संमेलन शंभरावे असल्यामुळे बैठकीला महत्त्व आहे. कोरोना काळात संमेलनाचे आयोजन आणि समन्वय आदी गोष्टींवर नियामक मंडळात चर्चा होण्याची शक्यता आहे.

५. संसदेत राष्ट्रीय युवा संसदेचे आयोजन

पुणे-तरुणांच्या कौशल्यात भर पडावा या उद्देशाने केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयातर्फे आज संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रीय युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. नेहरू युवा केंद्राच्या स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर विजयी होणाऱ्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या स्पर्धकांना अनुक्रमे 2 लाख, दीड लाख आणि एक लाख अशी परितोषिके दिली जाणार आहेत.

युवा संसद

६. काळूबाईची यात्रा बंद

सातारा-कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील मांढरदेवी गडावरील काळुबाईची जत्रा रद्द करण्यात आली आहे. काळुबाईचे मंदिर आजपासून काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मंदिर बंद असले तरी यात्रेदरम्यान देवस्थानचे विश्वस्त, मंदिर पुजारी आणि ग्रामस्थांना पूजा नेहमीप्रमाणे करता येणार आहे. या यात्रेला दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येत असतात.

काळूबाई मंदिर

७. टाटा मोटर्सकडून आज अल्ट्रोज कार लॉन्च

मुंबई- वाहन उद्योगाने सणासुदीनंतर विक्री व्यवसायात कात टाकायला सुरुवात केली आहे. टाटा मोटर्सनेही 2021 या नव्या वर्षामध्ये टाटा मोटर्स से ग्रेविटास SUV, अल्ट्रोजचे मॉडल्स आणले आहेत. टाटा मोटर्सकडून आज अल्ट्रोज कार लॉन्च करणार आहेत.

८. नाशिक स्थायी समितीचा निर्णय

नाशिक-स्थायी समिती सदस्य नियुक्ती करण्याच्या महापौर सतीश कुलकर्णी यांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. विरोधात निर्णय झाल्यास महापालिकेतील स्थायी समितीची भाजपची सत्ता जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिक उच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे नाशिक महापालिकेतील पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.

९. सोनू सूदच्या इमारतीला दिलासा मिळालेली शेवटची तारीख

मुंबई -सोनू सूदने जुहू येथील सहा मजली निवासी इमारतीचे परवानगी न घेता हॉटेलमध्ये रुपांतर केले आहे. यावर पालिकेने सोनू सूदला नोटीस बजावली होती. त्यावर उच्च न्यायालयात सोनू सूदने धाव घेतल्यानंतर न्यायालयाने १३ जानेवारीपर्यंत म्हणजे आजपर्यंत कारवाई न करण्याचे बीएमसीला आदेश दिले होते. त्यामुळे मुंबई महापालिका आज सोनू सूदच्या अनधिकृत बांधकामावर काय भूमिका घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

१०. लोकल सुरू होणार का?

मुंबई - टाळेबंदी दरम्यान लोकल रेल्वे सामान्य जनतेसाठी खुली करण्यामध्ये काय अडचण आहे? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली होती. त्यानंतर राज्य सरकारकडून आठ दिवसात या विषयी निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने 13 जानेवारीपर्यंत त्यावरील सुनावणी तहकूब केली आहे. त्यामुळे लोकल सुरू करण्याबाबत राज्य सरकारची भूमिका आज स्पष्ट होणार आहे.

Last Updated : Jan 13, 2021, 6:29 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details