नवी दिल्ली - आज सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील राम मंदिर -बाबरी मशीद वादग्रस्त जमीन प्रकरणी ऐतिहासिक निकाल दिला. या निकालात न्यायालयाने ही वादग्रस्त जमीन रामलल्लाची असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच प्रतिवादी मुस्लीम पक्षकारांना अयोध्येत पाच एकर पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
आज सकाळी १०.३० वाजता सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील ५ सदस्यीय खंडपीठाने निकाल देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी फैजाबाद न्यायालयाच्या निकालाला आवाहन देणारी शिया वक्फ बोर्डाची याचिका फेटाळली. फैजाबाद न्यायालयाचा १९४६ चा निर्णय तसाच राहणार असल्याचे न्यायालयाने स्पष्टे केले. त्यानुसार अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आज (शनिवार) आपला निकाल जाहीर केला.यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त जागा रामलल्लाचीच असल्याचे स्पष्ट केले आहे. तर मुस्लीम पक्षकारांना अयोध्येत ५ एकर पर्यायी जागा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही पर्यायी जागा केंद्र किंवा राज्य सरकार कोणीही देऊ शकते. या निकालानुसार वादग्रस्त असलेली २.७७ एकर जागा ही केंद्र सरकार नियंत्रित ट्रस्टला मिळणार असल्याचे न्यायालयाने या निकालात स्पष्ट केले.
निकालातील ठळक मुद्दे -
गोगोई म्हणाले बाबरी मशीद मीर बाकी यांनी बांधली, मात्र न्यायालयाने त्याच्या खोलात जाणे योग्य नाही. न्यायालय जनभावनेचा आणि आस्थेचा स्वीकार करते, त्यासाठी न्याय देताना समतोल राखणे गरजेचे आहे. तसेच यावेळी न्यायालयाने निर्मोही आखाड्याचा वादग्रस्त जागेवर दावा करणारी याचिका फेटाळून लावली आहे. मात्र त्यांना केंद्र सरकारच्या अख्यातरीत स्थापन करण्यात येणाऱ्या ट्रस्टमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.