नवी दिल्ली -आठवड्यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळ धडकल्यानंतर देश नव्या चक्रीवादळाला सामोरे जात आहे. हे निसर्ग नावाचे चक्रीवादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे.
निसर्ग हे चक्रीवादळाचे नाव भारताचा शेजारी असलेल्या बांगलादेशने दिलेले आहे. बांगलादेशने ओडिसामध्ये आलेल्या फनी या चक्रीवादळालाही 2019 मध्ये नाव दिले होते.
भारतीय महासागरामध्ये येणाऱ्या वादळांचे नाव निश्चित करण्यासाठी 2000 मध्ये समिती तयार करण्यात आली होती. त्याबाबतचा फार्मूला 2004 मध्ये निश्चित करण्यात आला आहे. यापुढे येणाऱ्या वादळाची नावेही निश्चित करण्यात आली आहेत. भारताने सुचवलेले गती, इराणने सुचलेले निवर, मालदीवने सुचवलेले बुरेवी, म्यानमारने सुचवलेले तौकताय आणि यास हे ओमनने सुचवलेले अशी चक्रवादळांची नावे यापुढे असणार आहेत.
चक्रीवादळांची नावे हे निश्चित केल्याने वैज्ञानिक समुदायाला आपत्कालीन व्यवस्थापनाला मदत होते. त्यामधून जनजागृती होते आणि मोठ्या प्रमाणात लोकांना धोक्याचा इशाराही परिणामकारकतेने मिळतो.