हैदराबाद - लोकांच्या दैनंदिन आयुष्यात तंत्रज्ञान खोलवर रुजत चालले आहे. मात्र, यामुळे संवेदनशील वैयक्तिक माहितीसंदर्भात तडजोड होण्याची शक्यता याअगोदर कधीच एवढ्या तीव्र प्रमाणात झाली नव्हती. खरेदी, मनोरंजन, आर्थिक व्यवहार, माहितीची (डेटा) साठवणूक, शिक्षण आणि सामाजिक संवाद यासारख्या अनेक बाबींसाठी लोक अधिकाधिक प्रमाणात इंटरनेटवर अवलंबून राहत आहेत. त्याचप्रमाणे, वर्क फ्रॉम अर्थातून घरातूनच काम करण्याची पद्धतदेखील रुढ होत चालली आहे. अशावेळी, सर्व व्यक्तींसाठी सायबर सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा निर्माण झाला असून वैयक्तिक सायबर सुरक्षा विमा घेणे अत्यावश्यक होत चालले आहे.
भारतीय संगणक आणीबाणी प्रतिसाद कक्षाने (सीईआरटी-इन) १९ जून रोजी सावधगिरीचा इशारा प्रसिद्ध केला होता. काही धुर्त घटकांकडून कोविड-१९ संबंधित उपक्रमांसाठी निधी वाटपाची सबब देत सुमारे २० लाख भारतीयांविरोधात मोठ्या प्रमाणात लोकांना बनावट ई-मेल पाठवण्याची (याला फिशिंग असे म्हणतात) मोहीम राबविली जाण्याची शक्यता आहे, असा इशारा संस्थेकडून देण्यात आला होता. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर जून महिन्याच्या सुरुवातीपासून चीनमधून भारतात होणाऱ्या सायबर हल्ल्यांचे प्रमाण २०० टक्क्यांनी वाढले आहे, अशी माहिती सायबर धोक्यांसंदर्भात गुप्तचर संस्था सायफर्माने सादर केलेल्या ताज्या अहवालात प्रसिद्ध झाली आहे.
अशावेळी आपण मिळवलेला कष्टाचा पैसा, सामाजिक प्रतिष्ठा आणि मानसिक आरोग्याचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. सायबर सुरक्षा संरक्षणामुळे यापैकी काही उद्दिष्ट साध्य करणे शक्य आहे.
वैयक्तिक सायबर विमा पॉलिसी म्हणजे काय?
सायबर सुरक्षेसंदर्भातील नियमांचे उल्लंघन झाल्यानंतर जे संभाव्य धोके उद्भवतात त्याची तीव्रता कमी करणे, यासाठी नुकसान भरपाईचा खर्च ऑफसेट करण्यात लोकांना मदत करण्यासाठी वैयक्तिक सायबर सुरक्षा पॉलिसीची रचना करण्यात आली आहे. १८ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्ती या विमा पॉलिसीसाठी पात्र ठरतात.
वैयक्तिक सायबर विमा कोणी खरेदी करावा?
भारतात कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन आर्थिक व्यवहार करण्यासाठी कोणताही डिजिटल मंच (खरेदी, सबस्क्रिप्शन्स, देयक अदा करणे, पैशांचे हस्तांतरण इत्यादी) वापरणाऱ्या तसेच पेमेंट गेटवे, क्लाऊड सेवा, घरगुती-सहाय्यक किंवा कनेक्टेड उपकरणांचा वापर करणाऱ्या व्यक्तींनी नक्कीच सायबर विमा घेण्याचा विचार करावा.
कोणकोणत्या विमा कंपन्या वैयक्तिक सायबर विमा पॉलिसी प्रदान करतात?
भारतात वैयक्तिक सायबर विमा प्रदान करणाऱ्या तीन प्रमुख कंपन्या आहेत. एचडीएफसी अर्गो, बजाज आलियान्झ जनरल इन्शुरन्स आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स या तीन कंपन्या सायबर विमा सेवा देतात.
याअंतर्गत कोणकोणत्या धोक्यांपासून संरक्षण मिळते?
या पॉलिसीअंतर्गत वैयक्तिक माहितीचा गैरवापर (आयडेंटिटी थेफ्ट), ऑनलाईन छळ (सायबर-बुलिंग), ऑनलाईन खंडणी (सायबर एक्सटॉर्शन), मालवेअरची घुसखोरी, बँक खाते, क्रेडिट कार्ड आणि मोबाईल वॉलेट्स यांच्या बेकायदेशीर किंवा फसवणुकीद्वारे करण्यात आलेल्या गैरवापरातून झालेले आर्थिक नुकसान इत्यादी धोक्यांपासून संरक्षण मिळते. बहुतांश पॉलिसींमध्ये संरक्षण देण्यात आलेल्या धोक्यांसंदर्भातील कायदेशीर खर्च देखील मिळतो. काही पॉलिसीअंतर्गत हानिकारक प्रकाशने काढून टाकत डिजिटल प्रतिष्ठा पुर्ववत करण्यासाठी लागणाऱ्या सर्व खर्चावर देखील दावा करता येतो.