नवी दिल्ली :दिल्लीमध्ये आज केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मार्चचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाला दुपारनंतर हिंसक वळण लागले. ठिकठिकाणी आंदोलक शेतकऱ्यांनी बॅरिकेट्स तोडत दिल्लीमध्ये प्रवेश केला. तर, पोलिसांनी या आंदोलकांना अडवण्यासाठी अश्रुधुर आणि लाठीचार्जचा वापर केला. दिल्लीमध्ये विविध ठिकाणी सुरू असलेल्या या हिंसाचारात कित्येक आंदोलक आणि पोलीसही जखमी झाले. तसेच, पोलिसांनी बॅरिकेट्स म्हणून वापरलेल्या वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
यानंतर सायंकाळच्या सुमारास आंदोलकांच्या एका गटाने लाल किल्ल्यामध्ये शिरत, किल्ल्यावर आपला झेंडा फडकवला. यानंतर आंदोलकांवर विविध स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात आली. या आंदोलनात हिंसक गोष्टी घडवून आणणारे लोक शेतकरी संघटनांचा भाग नाहीत, तर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आहेत असे स्पष्टीकरण संयुक्त किसान मोर्चाने दिले. तसेच वाढलेला हिंसाचार पाहता, सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येत मोर्चा स्थगित केल्याची घोषणा केली. यानंतर त्यांनी सर्व शेतकऱ्यांना तातडीने दिल्लीमधून सीमांवर परतण्याचे निर्देश दिले.
आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराचा शेतकरी संघटना, आम आमदमी पक्ष, कॅप्टन अमरिंदर सिंग, शरद पवार, राहुल गांधी यांच्यासह इतर नेत्यांनी आणि संघटनांनीही निषेध नोंदवला. दोन महिने शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाला आजच्या घटनांमुळे गालबोट लागल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, सरकारने शेतकऱ्यांचा रोष लक्षात घेऊन कृषी कायदे मागे घ्यावेत असे आवाहनही यावेळी करण्यात आले.