पटियाला - केंद्र सरकारने नुकत्याच समंत केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसचे आंदोलन सुरूच आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी पंजाबमध्ये 'खेती बचाओ' यात्रा पूर्ण करून हरयाणात पोहचले आहेत. काही वेळ हरयाणा पोलिसांनी त्यांना सीमेवर रोखले होते. मात्र, नंतर राज्यात प्रवेश दिला. केंद्र सरकारचे तिन्ही कायदे शेतकरीविरोधी असल्याचे म्हणत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी पंजाब हरयाणा सीमेवर काँग्रेस कार्यकर्त्यांसह नेत्यांनी गर्दी केली होती. कुरुक्षेत्र येथे हरयाणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुमारी शैलजा, रणदीप सुरजेवाला, कॅप्टन अजय यादव, कुलदीप बिष्णोई, किरण चौधरी, श्रुती चौधरी हे नेते उपस्थित होते. ट्रॅक्टरमधून उतरून राहुल गांधी कारने पिहोवाला रवाना झाले आहेत. तेथे रॅली आयोजित करण्यात आली आहे.