चंदीगढ -पंजाबंमधील मोगा जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवशी समाजकंटकांनी खलिस्तान्यांचा झेंडा फडकावल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे जिल्हा उपायुक्तांच्या कार्यालयावरील तिरंगा झेंडा खाली उतरवून खलिस्तानचा केशरी रंगाचा झेंडा फडकावला. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच हा झेंडा खाली उतरवून पुन्हा तिरंगा झेंडा फडकावण्यात आला.
ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दोन अज्ञात व्यक्ती तिरंगा खाली उतरवताना स्पष्ट दिसत आहेत. त्यांनी झेंड्याचा दोर कापून तेथे खलिस्तानचा झेंडा उभारला. पोलिसांनी सरकारी इमारतीवर पुन्हा तिरंगा झेंडा फडकावला.
'खलिस्तानचे चिन्ह आणि केशरी रंगाचा झेंडा आज सकाळी सव्वाआठ वाजता सरकारी इमारतीवर फडकावण्यात आला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे', असे वरिष्ठ पोलीस अधिक्षक हरंबिर गिल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. अमेरिका स्थिती 'शीख फॉर जस्टिस' या खलिस्तानवादी संघटनेने लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनी खलिस्तानी झेंडा फडकावणाऱ्या व्यक्तीला १ लाख २५ हजार डॉलरचे बक्षिस देण्याचे जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर या घटनेला पोलीसांनी गांभीर्याने घेतले आहे.
पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु केला आहे. लुधियानाचे काँग्रेस खासदार रनवीत सिंग बिट्टू यांनी आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.