पूर्णिया (बिहार) -कोरोनानंतर जगभरातील शिक्षण आणि व्यापाराची समीकरणं बदलली आहेत. रोजगार, उद्योगधंदे, कारखाने यावर मोठा विपरीत परिणाम महामारीमुळे झाला. शिक्षण क्षेत्रात देखील अमूलाग्र बदल करण्याची गरज तज्ज्ञांना भासू लागली. परिस्थिती आणखी खालावल्यानंतर राज्यांनी ऑनलाइन वर्ग भरवण्याची सुरुवात केली. मात्र, ऑनलाइन सेवांची कनेक्टिव्हिटी आणि त्यांची उपलब्धता यामुळे अनेक विद्यार्थी आजही ऑनलाइन शिक्षणापासून वंचित आहेत. शहरात आणि ग्रामीण भागातील शैक्षणिक परिस्थितीत असलेला विरोधाभास यामुळे आणखी बळावला आहे. या प्रक्रियेतून जाताना सर्व विद्यार्थी आणि पालकांना मोठ्या बदलांना आणि अडचणींना समोरे जावे लागत आहे.
झोपड्यांमध्ये तेवत ठेवलीय शिक्षणाची ज्योत
जिल्ह्यातील पंचमुखी मंदिर परिसरात रोजंदारीवर उदर्निर्वाह करणारी ५० कुटुंबं वास्तव्य करतात. झोपड्यांमध्ये राहणाऱ्या या परिवारातील मुले सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. मुलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या झोपड्यांमधील पालक आपल्या मुलांना शाळेत जाण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करत आहेत.
राजधानी पटनापासून ३७२ किमी दूर पुर्णिया जिल्ह्याच्या मुख्यालया नजीक सदर विधानसभा क्षेत्रात गरीब कुटुंबे राहतात. ज्यांची एकूण संख्या ३५०च्या जवळपास आहे. या वस्तीतील ७० टक्के मुलं शाळेत जातात. त्यातील निम्मी मुले खासगी शाळांमध्ये जात असून उर्वरित सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. या परिवारांमधील लोक सफाई कर्मचारी आहेत. जे शहरातील रुग्णालये, अन्य ऑफिसेसमध्ये काम करतात. त्यांना महिन्याला सात-ते आठ हजार पगार मिळतो. यामध्ये काही महिला सफाई कामगार देखील आहेत. त्यांना मुलांच्या शिक्षणासाठी वेळ देणे शक्य नसल्याने समस्या आणखी वाढल्या आहेत.