नवी दिल्ली -हिवाळा सुरू होण्यापूर्वी पूर्व लडाखमधील भारतीय सीमेवरील हालचाली वाढल्या आहेत. चिनी लष्कराचा सामना करण्यासाठी लष्कराची जोरदार तयारी सुरू आहे. समुद्र सपाटीपासून ऊंच आणि डोंगराळ भाग असल्याने लष्कराला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सीमावाद चिघळलेला असला तरी लष्करी स्तरावरील चर्चा सुरूच आहेत. दरम्यान, भारताने पूर्व लडाखमधील लष्करी नेतृत्वात बदल केला आहे. पुढील आठवड्यात भारत आणि चिनी लष्करात कॉर्प्स कमांडर स्तरावर चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्या आधी लष्करी नेतृत्वात बदल करण्यात आले आहेत.
हेही वाचा -हिवाळ्यातही चीनचा सामना करण्यास लष्कर सज्ज.. सीमेवर T-90, T-72 रणगाडे तैनात
पूर्व लडाखमध्ये तैनात असलेल्या १४th कॉर्प्सचे कमांडर हरिंदर सिंग यांची बदली इंडियन मिलिटरी अॅकेडमीच्या प्रमुखपदी करण्यात आली आहे. तर त्यांच्याजागी लेफ्टनंट जनरल पीजेके मेनन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात चिनी लष्करासोबत चर्चा होणार असल्याची माहिती पुढे येत आहे. चर्चेसाठीच्या भारतीय प्रतिनिधी मंडळात १४ th कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग, लेफ्टनंट जनरल पीजेके मेनन आणि परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव नवीन श्रीवास्तव सहभागी होणार असल्याची माहिती ईटीव्ही भारतला सुत्रांनी दिली आहे.