कोट्टायम- केवीन हत्येप्रकरणी कोट्टायम जिल्हा न्यायालयाने 10 आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच दोषींना प्रत्येकी 40 हजारांचा दंड ठोठावण्यात आला असून केवीनची पत्नी निनू आणि वडील जोसेफ यांना 1.5 लाख रुपये देण्यात येणार आहेत. दोषींनी दंड न भरल्यास त्यांना एकवर्ष अधिकचा कारावास भोगावा लागणार आहे.
ऑनर किलिंगमधून केवीन या 23 वर्षीय ख्रिश्चन दलित तरुणाची हत्या करण्यात आली होती. केरळ राज्यातील ऑनर किलिंगची ही पहिलीच घटना होती. केवीनचे अपहरण करुन हत्या करण्यात आल्यानंतर राज्यभरात मोठे आंदोलन उभे राहिली होते. आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी दलित संघटनांकडून होत होती.
निनू चाको आणि केवीन यांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले होते. मात्र, निनूच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता. चाको कुटुंबीय कथित उच्च जातीत येत असल्याने खोट्या प्रतिष्ठेपायी त्यांनी केवीनचा काटा काडण्याचे ठरवले. निनूच्या भावाने केवीनचे अपहरण करुन त्याचा खून केला. मागील वर्षी 28 मेला केवीनचा मृतदेह चलीयाकारा या नदीत सापडला होता.
मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने निनूच्या भावासह 10 जणांना दोषी ठरवले आहे. निनूच्या वडिलांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. केविनचे वडिल जोसेफ यांनी न्यायालयाच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी आनंदी आहे असे म्हणणार नाही. मात्र हे लोक या शिक्षेच्या लायक होते, असे त्यांनी म्हटले आहे.