कोल्लम -आज सर्व केरळी बांधव 'ओणम' हा सण साजरा करत आहेत. हा वर्षभरातील पहिला कापणीचा हंगाम असतो. या दिवशी भव्य 'ओणम संध्या' साजरी केली जाते. या दिवशी नागरिकांना पारंपरिक मेजवानी देण्यात येते. तर केरळातील कोल्लम जिल्ह्यातील परंपरेनुसार, माकडांनाही मेजवानी देण्यात येते. षष्ठमकोट्टा या मंदिरात ३५ वर्षांपासून ही परंपरा पाळण्यात येते.
वृत्तानुसार, षष्ठमकोट्टा मंदिरात माकडांना याही वर्षी त्यांचे आवडते खाद्य देण्यात आले. येथील देवळांमध्येही माकडांना वेगवेगळे खाद्यपदार्थ खाऊ घालण्यात आले. त्यांना लोणच्यापासून ते 'पायसम' या एका प्रकारच्या सांज्यापर्यंत सर्व काही कौतुकाने खाऊ घातले जात होते. मंदिराच्या परिसरात माकडांनी याचा यथेच्छ आस्वाद घेतला.
या माकडांचा म्होरक्या आधी झाडावरून खाली आला. त्याने सर्व काही चाखून पाहिले. त्यानंतर त्याच्या सर्व मित्रमंडळींना त्याने भोजनासाठी पाचारण केले. त्यानंतर सर्व वानरसेनेने सर्व खाद्यान्नांवर यथेच्छ ताव मारला.