तिरूवअनंतपुरम - केरळच्या एका विद्यार्थ्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निश्चित झाले आहे. कोरोनाचा संसर्ग झालेली ही भारतातील पहिली व्यक्ती ठरली आहे. हा विद्यार्थी चीनच्या वुहान विद्यापीठामध्ये शिक्षण घेत होता, अशी माहिती मिळत आहे.
सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर असून, त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
चीनमधील कोरोना विषाणूच्या बळींची संख्या दिवसेंदिवस अधिक वेगाने वाढत चालली आहे. आजपर्यंत तब्बल १७० जणांचा बळी गेल्याची माहिती मिळत आहे. तर जवळपास आठ हजार लोकांना याचा संसर्ग झाल्याचे समजत आहे. चीनबाहेर जवळपास ९० लोकांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. अमेरिका, जपान आणि इतर देश चीनमधील आपापल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी पुढे सरसावले आहेत. चीनच्या हुबेई प्रांतातील भारतीय नागरिकांना देशात परत पाठवण्यासाठी चीन सरकारने परवानगी मागितली आहे. यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पार पाडण्यासाठी चीनमधील भारतीय दूतावास चीन सरकारशी बोलणी करत असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी काल (बुधवार) दिली.
दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील २१ विमानतळांवर प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग करण्यास सुरुवात केली आहे. याआधी देशातील काही विमानतळांवर अशा प्रकारचे स्कॅनिंग सुरू करण्यात आले होते. आता या विमानतळांमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
हेही वाचा : कोरोना विषाणू : भारतात २१ विमानतळांवर 'थर्मल स्कॅनिंग' सुरू..