तिरुवअनंतपुरम - केरळमध्ये आणखी एका व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निश्चित झाले आहे. कोरोनाचा संसर्ग झालेली ही भारतातील दुसरी व्यक्ती ठरली आहे. ही व्यक्ती नुकतीच चीनमधून परतल्याची माहिती आहे. यापूर्वी कोरोनाचा संसर्ग झालेले पहिला रुग्ण हा केरळमधीलच एक विद्यार्थी आहे. हा विद्यार्थी चीनच्या वुहान विद्यापीठामध्ये शिक्षण घेत होता.
चीननंतर केरळमध्ये कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळल्यानंतर देशभरात कोरोनाची दहशत परसली. केरळमध्ये दोघांना कोरोना विषाणूंची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून त्याला रुग्णालयात विशेष विभागात दाखल करण्यात आले आहे. सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर असून, त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. चीनमधील कोरोना विषाणूच्या बळींची संख्या दिवसेंदिवस अधिक वेगाने वाढत चालली आहे. आजपर्यंत जवळपास 300 जणांचा बळी गेल्याची माहिती मिळत आहे. तर जवळपास दहा हजारांच्या आसपास लोकांना याचा संसर्ग झाल्याचे समजत आहे.