तिरुवअनंतपूरम -आखाती देशांसह इतर देशांमध्ये असणाऱ्या भारतीय नागरिकांना परत मायदेशी आणण्याचा निर्णय केरळ सरकारने घेतला आहे. यासाठी केरळातील ३ विमानतळे सज्ज आहेत. गुरुवारपासून सुरू होणाऱ्या या उपक्रमाला पुढील पाच दिवसात जवळपास २ हजार ७०० भारतीय नागरिक केरळमध्ये पोहोचतील, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे प्रवासंबदी असल्याने अनेक भारतीय नागरिक विदेशात अडकून पडलेले आहेत.
भारतीय नौदलाची तीन जहाजे विदेशातील भारतीयांना परत आणण्यासाठी मालदीव आणि संयुक्त अरब अमिरातीसाठी रवाना झाली आहेत. यातील पहिले विमान अबुधावी येथून गुरुवारी २०० प्रवाशांना घेऊन कोची विमानतळावर रात्री ९:४५ ला पोहचणार आहे. कोची, कोझीकोड आणि तिरुवअनंतपूरम येथील विमानतळांवर प्रवाशांची सुविधा केली आहे. तिरुवअनंतपूरम विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याची सुविधा केलेली आहे. सहा तालुक्यांमध्ये जवळपास ११ हजार लोकांच्या क्वारंटाईनची सुविधा करण्यात आली आहे. याचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार आहे. ६ हजार ४०० लोकांसाठी हॉटेल्सच्या रूम बुक केल्या आहेत मात्र याचा खर्च व्यक्तिगत असेल, असेही सरकारकडून सांगण्यात आले. सरकारने जारी केलेल्या प्रोटोकॉलनुसार सर्व प्रवाशांना नियम पाळावे लागणार असल्याचेही सांगण्यात आले.