नवी दिल्ली -दिल्ली विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आली असून दिल्लीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गुरुवारी गृहमंत्री अमित शाह यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. 'देशामध्ये जर खोटी आश्वासन देणाऱ्या लोकांची स्पर्धा घेण्यात आली. तर त्यात केजरीवाल यांना पहिले बक्षीस मिळेल', असे शाह म्हणाले. मटियाला येथील प्रचार सभेत ते बोलत होते.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यामुळे केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. मात्र, मोदी सरकारने लोकपाल कायदा आणल्यानंतर त्यांनी कायदा दिल्लीमध्ये लागू केला नाही, असे शाह म्हणाले. 5 वर्षांपूर्वी दिल्लीतील जनतेने केजरीवाल यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना मतदान केले. मात्र केजरीवाल यांनी लोकांचा विश्वास तोडला. गेल्या पाच वर्षात केजरीवाल सरकारने काहीही काम केले नाही. दिलेली आश्वासने तुम्ही विसरलात. मात्र, ती आश्वासने दिल्लीतील जनता आणि भाजप कार्यकर्ते विसरले नाहीत, असे शाह म्हणाले. केजरीवाल यांनी यमुना नदी स्वच्छ करण्याचे आश्वासनदेखील पूर्ण केले नाही. मोदी आणि योगी यांनी गंगा स्वच्छ केली. त्याच प्रकारे यमुना आम्हीच स्वच्छ करू, असे शाह म्हणाले. केजरीवाल यांनी केंद्राच्या योजनांमध्ये अडथळे आणले. प्रधानमंत्री आवास योजना व आयुष्मान भारत यांची केजरीवाल यांनी अंमलबजावणी केली नाही, असे शाह म्हणाले. दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या 8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडेल. तर, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी दिली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत तत्काळ प्रभावी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.