दिल्ली-भाजप खासदार गौतम गंभीरने केजरीवाल सरकारवर आज(शुक्रवार) सडकून टीका केली. 'राजधानी दिल्लीत कोरोना चाचणीची सुविधा आणि वाढलेलल्या रुग्णसंख्येवरून केजरीवाल यांनी केंद्र सरकारला जबाबदार धरले. आता ते सर्वोच्च न्यायलयाला लक्ष्य करतील, असे खासदार गौतम गंभीर म्हणाला आहे.
'बी अवेयर दिल्ली ("BEWARE DELHI!) हे अभियान अयशस्वी झाले आहे. केंद्र सरकार, रुग्णालये, चाचणी, अॅप यांना दोष देण्यात आला आहे. यापुढे सर्वोच्च न्यायालयाला दोष दिला जाईल. त्यामुळे गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडा, कारण मुख्यमंत्री तुमची काळजी घेणार नाहीत', असे ट्विट गौतम गंभीरने केले.
कोरोना रुग्णांवरील उपचार आणि मृतदेहांच्या हेळसांडीवरून सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकारले. त्यावरून गौतम गंभीरने केजरीवालांवर निशाणा साधला. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने या प्रकरणी सुनावणी केली. कोरोना संकट काळात दिल्लीतील रुग्णांची काळजी भयंकर आणि भीतीदायक पद्धतीने घेतली जात आहे, असे म्हणत दिल्ली सरकारला फटकारले. कोरोनाग्रस्तांची अत्यंत भयंकर पद्धतीने काळजी घेतली जात आहे, मृतदेह कचऱ्यातही सापडायला लागले आहेत.
रुग्णालयात भरती केलेल्या रुग्णांची अत्यंत वाईट अवस्था पहा. वार्डामध्ये कोठेही शव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे उपचार चालू असलेल्यांचीही आम्हाला चिंता वाटते. दिल्लीत रुग्णालयात कोठेही मृतदेह ठेवले असल्याचे माध्यमांतूनही समोर आले आहे, त्याचा हवाला न्यायालयाने दिला.
बाकी राज्यात कोरोना चाचणीचे प्रमाण वाढविण्यात येत असताना दिल्लीत 7 हजार चाचण्या होत होत्या आता 5 हजार चाचण्या घेण्यात येत आहेत. दिल्लीत 2 हजार खाटा उपलब्ध आहेत. मात्र, रुग्णांची काळजी घेण्यासाठी कोणीही नाही. कोरोनाग्रस्तांवर प्राण्यांपेक्षाही भयंकर पद्धतीने उपचार केले जात आहेत. एका घटनेत तर मृतदेह कचऱ्यात आढळून आला, याचे उदाहरण न्यायालयाने दिले.