नवी दिल्ली - दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही विरोधी पक्ष म्हणजेच भाजपची आहे. त्यामुळेच माझ्यावर हल्ला झाला, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर केला आहे.
केजरीवाल म्हणाले, मागील पाच वर्षात माझ्यावर झालेला हा नववा हल्ला आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा पाचवा हल्ला आहे. मला असे वाटत नाही की भारताच्या इतिहासात एखाद्या मुख्यमंत्र्यावर असा हल्ला झाला असेल.
संपूर्ण भारतात फक्त दिल्लीच्याच मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही विरोधी पक्षाकडे आहे. हा विरोधी पक्ष म्हणजे भाजप असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
जो कुणी मोदी यांच्या विरोधात बोलेल त्यांना या देशात माफ केले जाणार नाही. हा संदेश देण्यासाठीच हल्लेखोराला माझ्यावर हल्ला करण्यासाठी पाठवण्यात आले होते. आपल्या विरोधातील प्रत्येक आवाज बंद करणे हे हुकूमशाहीचे लक्षण आहे. हा हल्ला अरविंद केजरीवाल यांच्यावर नाही तर दिल्लीच्या जनमतावर आहे.
येथे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यावर हल्ला होतो, आणि केंद्र सरकार म्हणते की याविषयी कोणतीही तक्रार आली नाही. त्यामुळे पुढील कारवाई केली नाही. अशा प्रकारे व्यवस्था असेल तर पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली.