गुवाहाटी - आसाम राज्यात ब्रह्मपुत्रा नदीला आलेल्या पुरामुळे निम्म्याहून अधिक जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे आसाममधील पूरस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. राज्यातील २८ पैकी १८ जिल्हे पुराने प्रभावित झाले असून तब्बल 26 लाख लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर वन्यजीवांवर देखील याचा परिणाम झाला आहे.
आसाममधील लोकप्रिय काझीरंगा राष्ट्रीय उद्यानालाही याचा फटका बसला आहे. ब्रह्मपुत्रा नदीत येणाऱ्या पुरांमुळे इथल्या प्राणिजगतावर बराच परिणाम झाला आहे. १३ जुलै ते २१ जुलै या कालावधीत सुमारे १६२ वेगवेगळ्या वन्यजीवांची यात मृत्यू झाला आहे.
सुमारे १६२ वेगवेगळ्या वन्यजीवांचा मृत्यू
आसाममध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे तेथील वन्यजीवांना सर्वाधिक फटका बसला आहे. जीवाच्या आकांताने ते सैरावैरा धावताना दिसत आहे. तर, कधी मानवी वस्तीतही घुसताना दिसत आहे. आसाममधील लोकप्रिय काझीरंगा राष्ट्रीय उद्यानालाही याच मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. काही दिवसांपूर्वी एक हत्तीचा कळप पुराच्या पाण्याच्या मधोमध अडकलेला आढळून आला होता.
हत्तीचा कळप पुराच्या पाण्याच्या मधोमध अडकलेला आढळून आला होता
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे भारतातील आसाम राज्यातील राष्ट्रीय उद्यान आहे. याचा समावेश जागतिक वारसा स्थानांत केलेला असून, जगात सापडणाऱ्या भारतीय एकशिंगी गेंड्यांपैकी दोन-तृतीयांश गेंडे या अभयारण्यात सापडतात. काझीरंगामध्ये अनेक वाघ असून २००६ मध्ये त्याला वाघांचे अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. ४३० चौरस कि.मी. एवढे मोठे हे अभयारण्य आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावरील सुमारे १५२ वर्ग कि.मी. भाग या क्षेत्राला जोडण्यात आलेला आहे.