इराणमधून आणून राजस्थानच्या जैसलमेरमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या काश्मिरी विद्यार्थ्यांना अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कोविड-१९ ची लागण होण्याची अधिक शक्यता असल्याचे वाटू लागले आहे.
प्रत्येक जाणाऱ्या दिवसाबरोबर जैसलमेरच्या विलगीकरण केंद्रात मला अस्वस्थ वाटत आहे. १४ दिवस आम्हाला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आणि आता २० दिवस होत आले आहेत. आम्हाला कुणीही काहीही सांगत नाही, असे वाटते की आम्हाला केवळ अलग ठेवण्यात आले आहे, असे इराणमधील वैद्यकीय विद्यार्थिनी अनसब नबी हिने सांगितले. तिला १५ मार्च रोजी इराणमधून आणले आहे. अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी विलगीकरणात ठेवले नसल्याने ही अनिश्चितता आहे, असे तिला वाटते. आम्ही येथे केवळ विद्यार्थी नाही. येथे इराणच्या कौममधून आणलेले भाविकही आहेत आणि त्यापैकी काही कोरोनाच्या चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळले आहेत, असे नबीने 'ईटीव्ही भारत'शी दूरध्वनीवरून जैसलमेरहून बोलताना सांगितले.
तिने पुढे असेही सांगितले की येथे आम्हाला जेवणासाठी एकच हॉल आहे आणि २० लोकांमध्ये मिळून फक्त दोन स्वच्छतागृहे आहेत. २० लोकांना एकाच हॉलमध्ये ठेवले आहे, जो एका मोठ्या इमारतीचा भाग आहे. अनसाबने सांगितले की जैसलमेर विलगीकरण केंद्रात केवळ काश्मिरी विद्यार्थ्यांना ठेवलेले नाही. २५० हून अधिक काश्मिरी विद्यार्थी राजस्थानच्या जैसलमेर आणि जोधपूर क्वारंटाईन केंद्रात ठेवले असून ते घरी पाठवण्याच्या प्रतिक्षेत आहेत. राजस्थान सरकारच्या माहितीनुसार, जैसलमेर विलगीकरण केंद्रात १७० काश्मिरी विद्यार्थी असून त्यापैकी इराणमधून आलेले १०० आहेत.
भारतीय सरकारने १४ मार्च रोजी इराणमधून जवळपास ३०० विद्यार्थ्यांना मायदेशी आणले आणि खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना जैसलमेरच्या लष्कर कल्याण केंद्रात विलग करून वैद्यकीय देखरेखीखाली ठेवले. नोवल कोरोना विषाणुचा जगभरात उद्रेक झाल्यावर, इराण हा मध्यपूर्व आशियामधील सर्वाधिक तडाखा बसलेला देश ठरला, जेथे ३ हजाराहून अधिक लोक आजाराने मृत्युमुखी पडले आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना ही काळजी आहे की विविध जोखमीच्या गटांना एकत्र केले असल्याने खबरदारी घेऊन जे विद्यार्थी इराणच्या साथीतून सहीसलामत बाहेर आले, ते आता पुन्हा कोरोनाला बळी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.