श्रीनगर- जम्मू काश्मीर राज्यामध्ये मागील १५ दिवसांपासून मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद आहे. ३७० कलम रद्द केल्यानंतर राज्यामधील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे नागरिक पत्राद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पोस्ट कार्यालये बंद असल्यामुळे सरकारने आम्हाला १०० वर्ष मागे ढकलले आहे, अशा संतापजनक प्रतिक्रिया काश्मीरातील नारिकांनी व्यक्त केल्या आहेत.
सरकारने आम्हाला १०० वर्ष मागे ढकललं, पत्र पाठवायलाही जमेना; काश्मीरींचा संताप - कलम ३७०
पोस्ट कार्यालये बंद असल्यामुळे सरकारने आम्हाला १०० वर्ष मागे ढकलले आहे, अशा संतापजनक प्रतिक्रिया काश्मीरातील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
पोस्ट ऑफिस कार्यालये कायम बंद असतात. कधीकधी फक्त दिवसातील १ तास कार्यालय सुरू होते. त्यामुळे आमचे हाल होत आहेत, असे शबिर अहमद या स्थानिक नागरिकांने म्हटले आहे. संपर्क व्यवस्था बंद केल्यामुळे सरकारने आम्हाला पुन्हा एकदा जुन्या काळामध्ये पाठवले आहे, असे अहमद म्हणाले. अनेक ठिकाणी पोस्ट कार्यालयांच्या दरवाज्यांवर पत्रक लावण्यात आले आहे. या पत्रकावर नाव नोंदवल्यानंतर पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी तुमच्याशी संपर्क साधेल असे लिहेल आहे.
मी ८० च्या दशकात पत्र पाठवायचो. मात्र, सरकारने आता पुन्हा आम्हाला जुन्या जमान्यात पाठवले आहे, असे फैयाज अहमद यांनी ईटीव्हीशी बोलताना सांगितले. मला जम्मूला तत्काळ एक स्पीड पोस्ट पाठवायचे आहे, मात्र, पोस्ट ऑफिस बंद आहे, असे म्हणत हतबलता व्यक्त केली. संपर्क व्यवस्था बंद ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.