नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काश्मीर प्रकरणी पाकिस्तानवर हल्लाबोल केला आहे. काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असून त्याप्रकरणी पाकिस्ताने दखल देण्याची गरज नाही, असे राहुल यांनी टि्वट करून म्हटले आहे.
'मी सरकाशी बऱ्याच प्रकरणी असहमत आहे. मात्र, मी स्पष्ट करू इच्छितो की, काश्मीरचा अंतर्गत मुद्दा आहे. यामध्ये पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही देशाने हस्तक्षेप करण्याची गरज नाही. पाकिस्तानला जगभरात दहशतवादाचे समर्थक मानले जाते. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादामुळेच जम्मू काश्मीरमध्ये हिंसा झाली', असे राहुल गाधींनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
याप्रकरणी काँग्रेस पक्षाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पाकिस्तानने राहुल गांधी यांच्याविषयी चुकीची माहिती दिली आहे. काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग असून पाकिस्तानच्या खोट्या वक्तव्यामुळे ते बदलनार नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.
काय प्रकरण-
पाकिस्ताने मंगळवारी काश्मीर प्रकरणी संयुक्त राष्ट्राला पत्र लिहून भारताची तक्रार केली. यामध्ये त्यांनी राहुल गांधीच्या टि्वट आणि विधानाचा उल्लेख केला आहे. काश्मीरमध्ये लोक मरत असून तेथील परिस्थिती सामान्य नाही असे भारतातील काँग्रेस पक्षाचे नेता राहुल गांधी म्हणत आहेत, असा हवाला पाकिस्तानने पत्रात दिला आहे. भारताने मानवधिकार कायद्याचे उल्लघंन केले असून राज्यात हिंसा वाढली आहे, अशी तक्रार पाकिस्ताने संयुक्त राष्ट्राकडे केली आहे.