नवी दिल्ली - गुरुद्वारा दरबार साहिब करतारपूर या पाकिस्तानातील शिखांच्या पवित्र स्थळाला भेट देणाऱ्या भाविकांना शुल्क आकारण्यास पाकिस्तान आग्रही आहे. मात्र, भाविकांना शुल्क आकारू नये असा आग्रह भारताचा आहे. पाकिस्तानच्या या मागणीमुळे करतारपूर कॉरिडॉर करार अडकून पडला आहे. बाकी सर्व गोष्टींवर दोन्ही देशांत एकमत झाले असून फक्त पाकिस्तानच्या शुल्क आकारणीच्या मुद्दयावरून अडकून पडल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांन सांगितले.
हेही वाचा -पोलिसांचा 'अजब' कारभार, ट्रक चालकाला विनाहेल्मेट वाहन चालविल्यामुळे पाठवले चलन
गुरुद्वारा दरबार साहिब करतारपूर धार्मिक स्थळाला भेट देणाऱ्या भाविकांना २० डॉलर म्हणजेच सुमारे १ हजार ४२० रुपये शुल्क आकारावे असा पाकिस्तानचा आग्रह आहे. मात्र, हा उपक्रम दोन्ही देशातील लोकांना जोडण्यासाठी करण्यात येत आहे, असे भारताचे मत आहे. गुरुनानक साहिब यांच्या ५५० व्या जयंती निमित्त करतारपूर कॉरिडॉरचे काम पूर्ण व्हावे, असा भारताचा आग्रह आहे.