नवी दिल्ली -भारत आणि पाकिस्तानचे अधिकारी आज करतारपूर कॉरिडॉरसंबंधीची प्रक्रिया आणि तांत्रिक मुद्द्यांवरील द्विपक्षीय बैठकीसाठी एकत्र आले आहेत. पाकिस्तानातील वागाह सीमेवर भारतीय प्रतिनिधिमंडळ पोहोचले आहे. या चर्चेत पाकिस्तानचे २० अधिकारी सहभाग घेणार आहेत. पाक परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैजल पाक प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व करत आहेत. आज करतारपूर कॉरिडॉरसंबंधीच्या दोन्ही देशांच्या धोरणाला अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता आहे.
ही बैठक एका दिवसावर असताना पाकिस्तानने शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीचे पुनर्गठन केले. यातील नावांच्या यादीमधून खलिस्तानी नेते गोपाल सिंग चावला यांचे नाव वगळण्यात आले आहे. याआधी दोन्ही देशांदरम्यान २ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील बैठक होणार होती. मात्र, पकिस्तानकडून काही वादग्रस्त व्यक्तींची कॉरिडॉरसंबंधी समितीत नेमणूक करण्यात येणार असल्याच्या अहवालांनतर ती चर्चा पुढे ढकलण्यात आली होती.