Live Updates :
5:22 PM -मुंबई पोलिसांनी शिवकुमार आणि इतर मंत्र्यांना दिलेली वागणूक अत्यंत वाईट आहे. या घटनेमुळे भारताच्या लोकशाहीवर एक काळा डाग पडला आहे, असे कर्नाटक मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.
4:56 PM - मी आतापर्यंत कुणाचाही राजीनामा स्वीकारलेला नाही. एका रात्रीत हा निर्णय घेऊ शकत नाही. यासाठी आमदारांना 17 जुलैपर्यंत वेळ दिला आहे. पूर्ण प्रकियेतून जाऊन निर्णय घेतला जाईल , असे कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी सांगितले आहे.
4:22 PM -आमदार नागराज आणि के. सुधाकर यांनी राजीनामे जमा केले आहेत. आता राजीनामा देणाऱ्या आमदारांची संख्या 16 झाली आहे.
4:18 PM -आम्ही शांततेत आमदारांशी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली असताना आम्हाला पोलिसांनी बळाचा वापर करुन ताब्यात घेतले असल्याचे मिलिंद देवरा यांनी सांगितले आहे.
4:19PM -कर्नाटकचे जलसंपदा मंत्री डी. के. शिवकुमार आणि नसीम खान, मिलिंद देवरा आणि इतर कॉंग्रेस नेत्यांना कालिना विद्यापीठातील विश्रांतीगृह येथे ठेवण्यात आले आहे.
4:03 PM -कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येदियुराप्पा कर्नाटक विधानसभा सभापती के. आर. रमेश कुमार यांच्या भेटीला.
2:55 PM -गुलाम नबी आझाद यांच्यासह काँग्रेस नेत्यांना बंगळुरु येथे राजभवनसमोरून ताब्यात घेण्यात आले. ते बंडखोर आमदारांचा निषेध करत होते.
2:50 PM -अभिषेक मनू सिंघवी आमच्या बाजूचे म्हणणे सर्वोच्च न्यायालयात मांडतील, अशी माहिती काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी दिली.
2:35 PM -काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार, नसीम खान, मिलिंद देवरा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्वांना कलिना विद्यापीठ रेस्ट हाऊस येथे नेण्यात येणार आहे. परिसरात सेक्शन १४४ (जमावबंदी) लागू.
01:12 PM -येदियुराप्पा विधानसभा अध्यक्षांना दुपारी ३ वाजता भेटणार.
त्यांनी शिवकुमार यांनी बंडखोर आमदारांचे राजीनामे फाडल्यावरून रोष व्यक्त केला आहे. 'अध्यक्षांनी अद्यापही शिवकुमार यांनी राजीनामे फाडल्याचा निषेध केलेला नाही. तसेच, कोणतीही कारवाई केलेली नाही. राजीनामे फाडून टाकणे हा गुन्हा आहे. तो क्षम्य नाही,' असे ते म्हणाले.
01:06 PM -कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येदियुराप्पा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. '१२ जुलैला विधानसभेचे सत्र सुरू होणार आहे. मात्र, सत्ताधारी पक्षाकडे बहुमत नाही. त्यामुळे या स्थितीत सत्र सुरू केल्यास ते बेकायदेशीर ठरेल. अजूनही उशीर झालेला नाही. कुमारस्वामींनी राजीनामा देऊन भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी रस्ता मोकळा करून द्यावा,' असे ते म्हणाले.
12:28 PM -मुंबईतील काँग्रेस नेते मिलिंद देवरा, संजय निरुपम यांनी शिवकुमार यांची भेट घेऊन स्थानिक पक्षनेत्यांद्वारे मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. शिवकुमार यांना कोणतीही मदत करण्यासाठी स्थानिक काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
याशिवाय, देवरा यांनी शिवकुमार यांना बंगळुरु येथे परत जाऊन हा मुद्दा घटनात्मक रीतीने सोडवण्याचा पर्यायही सुचवला आहे. महाराष्ट्रात भाजप सरकार असल्याने ते त्यांच्या ताकदीचा गैरवापर करत आहेत, असे सांगत देवरा यांनी घटनात्मक रीतीनेच हा प्रश्न सुटू शकेल, असे म्हटले आहे.
11:47 AM -९ जुलै ते १२ जुलैदरम्यान (या दोन्ही तारखांसह) पवई पोलीस ठाण्याकडून ठाणे परिक्षेत्रात सेक्शन १४४ (जमावबंदी) लावण्यात आला आहे.
11:01 AM - बंडखोर आमदारांचे मन वळवण्यासाठी आलेल्या कर्नाटकचे मंत्री डी. के. शिवकुमार यांचे मुंबईतील रेनायसन्स हॉटेमधील बुकिंग रद्द.
10:58 AM -'आमचा वरिष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांना अपमानित करण्याचा हेतू नाही. आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे. मात्र, काही कारणामुळे आम्ही हे पाऊल उचलले आहे. मैत्री, प्रेम, सौहार्द हे सध्या एका बाजूला आहेत. त्यामुळे आम्ही आदरपूर्वक त्यांना विनंती करत आहोत की, आम्ही त्यांना का भेटू शकत नाही, हे त्यांनी समजून घ्यावे,' असे बंडखोर काँग्रेस नेते बी. बसवराज यांनी म्हटले आहे.
10:53 AM -सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी बंडखोर नेत्यांची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालय गुरुवारी सुनावणी घेण्याची शक्यता आहे. बंडखोर नेत्यांच्या अंतिम मुदतीचा मुद्दा विचारात घेऊन त्यांची याचिका ग्राह्य धरण्यात येईल किंवा नाही आणि त्याचा यादीत समावेश होईल का, याविषयी सर्वोच्च न्यायालय उद्या निर्णय देणार आहे.
10:32 AM -'कर्नाटक विधानसभा अध्यक्ष त्यांच्या घटनात्मक कर्तव्यापासून पळ काढत आहेत. तसेच, त्यांचे राजीनामे स्वीकार करण्यास जाणीवपूर्वक विलंब करत आहेत,' असे बंडखोर आमदारांचे म्हणणे आहे. यासाठी काँग्रेस-जेडीएसच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले बंडखोर आमदार सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
10:15 AM -बंडखोर आमदारांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी डी. के. शिवकुमार यांनी परत जावे, अशी मागणी केली आहे. आम्ही कोणाशीही बोलण्यास तयार नाही. बंगळुरु येथे परत गेल्यानंतर आम्ही सर्वात आधी शिवकुमार यांच्याशी बोलू.
आम्ही अजूनही काँग्रेसमध्येच आहोत. सिद्धरामय्या हेच आमचे नेते आहेत. मात्र, आज आम्हाला कोणाशीही बोलायचे नाही.
बंगळुरू -कर्नाटकातील अवघे १३ महिन्यांचे काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार सध्या मोडकळीस आले आहे. बंडखोर आमदार अजूनही मुंबईत आहेत. त्यांचे मन वळवण्यासाठी मुंबईत पोहोचलेले काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे जलसंपदा मंत्री डी. के. शिवकुमार यांना भेटण्यास त्यांनी नकार दिला आहे. शिवकुमार यांना पोलिसांनी हॉटेलमध्ये प्रवेश करण्यापासून रोखले आहे.
मागील आठवड्यापासून आतापर्यंत राजीनामा देणाऱ्या आमदारांची संख्या १५ झाली आहे. काल (मंगळवारी) ८ आमदारांचे राजीनामे विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी बेकायदेशीर ठरवले. हे आमदार पुन्हा राजीनामे सादर करणार आहेत.