महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Live Updates : बंडखोर आमदारांचे मन वळवण्यासाठी गुलाम नबी आझाद बंगळुरूमध्ये दाखल - h. d. DeveGowda

मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यासाठी काल सर्व काँग्रेस आणि जेडीएसच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले. राजीनामे दिलेल्या बंडखोर नेत्यांना परत येण्यास संधी मिळावी, म्हणून हा निर्णय घेण्यात आला. सध्या बंडखोर नेत्यांशी चर्चा करून त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कर्नाटक विधानसभा

By

Published : Jul 9, 2019, 11:58 AM IST

Updated : Jul 9, 2019, 9:45 PM IST

बंगळुरु - कर्नाटकातील अवघे १३ महिन्यांचे काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार सध्या मोडकळीस आले आहे. काल एच. नागेश या अपक्ष आमदाराने सरकारचा पाठिंबा काढून घेत मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तसेच, भाजपला पाठिंबा देण्याचेही जाहीर केले. यामुळे मागील आठवड्यापासून आतापर्यंत राजीनामा देणाऱ्या आमदारांची संख्या १५ झाली आहे. यापैकी १३ सध्याच्या सत्ताधारी काँग्रेस आणि जेडीएसमधील आहेत. पक्षविरोधी कारवायांसाठी निलंबित करण्यात आलेले काँग्रेसचे रोशन बैग यांनीही काँग्रेसला रामराम ठोकून भाजपप्रवेश करणार असल्याचे म्हटले आहे.

Live Updates :

9:16 - नियमबाह्य राजीनामा असलेले ८ आमदार उद्या बंगळुरूला परतणार. आमदार सध्या मुंबईतील सोफिटेल हॉटेलमध्ये राहत आहेत. आज विधानसभा अध्यक्षांनी १३ बंडखोर आमदारापैकी ८ आमदारांचे राजीनामे नियमबाह्य ठरवले होते.

8:47 - गुलाम नबी आझाद, केसी वेणुगोपाल, सिद्धारामय्या, दिनेश गुंडुराव, मल्लिकार्जून खरगे, ईश्वर खांद्रे आणि जमीर अहमद यांच्यासह बंगळुरू येथील कुमार कृपा गेस्ट हाऊसमध्ये काँग्रेसची बैठक

7:58- गुलाम नबी आझाद कुमारांसह केसी वेणुगोपाल कृपा यांच्या गेस्ट हाऊसवर काँग्रेस नेत्यांसोबत घेणार बैठक. बैठकीला सिद्धारामय्या, जी परमेश्वर, दिनेश गुंडुराव यांच्यासह एच.डी देवेगौडा आणि एच.डी कुमारस्वामी राहणार उपस्थित.

7:30 - भाजप कमिटी उद्या राज्यपालांची भेट घेणार आहे. यावेळी राज्यपालांसह विधानसभा अध्यक्षांसोबत आमदारांचे राजीनामा स्वीकारण्यास होत असलेल्या विलंबाबत चर्चा करणार आहोत. उद्या भाजप कमिटीची बैठक होणार आहे. गांधी पुतळ्यासमोर उद्या सकाळी सर्व आमदार आंदोलन करणार आहेत, अशी माहिती भाजप नेते अरविंद लिंबावली यांनी दिली.

6:47 - काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद बंगळुरूमध्ये दाखल. बंडखोर आमदारांशी संवाद साधताना मनधरणीचा शेवटचा प्रयत्न करणार. आझाद म्हणाले, मी सध्या काहीही सांगणार नाही. परंतु, आम्ही बंडखोर आमदारांची मनधरणी करुन नक्कीच सरकार टिकवू.

5:44 - भाजप आमदारांनी विधानसभा अध्यक्ष रमेशकुमार यांच्या कार्यालयात भेट दिली. परंतु, रमेशकुमार उपस्थित नसल्यामुळे आमदार माघारी परतले.

5:28 - बंडखोर आमदार नियमानुसार पुन्हा देणार राजीनामा. मुंबईतील सोफिटेल हॉटेलमध्ये थांबलेले आमदार बंगळुरुकडे रवाना होणार. विधानसभा अध्यक्षांनी राजीनामे नियमबाह्य असल्याचे ठरवल्यानंतर आमदारांचा निर्णय.

5:27- मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आंदोलन करणार. उद्या गांधी पुतळ्यासमोर सकाळी ११ वाजता भाजप नेते आंदोलन करणार असल्याची माहिती माहिती येडियुरप्पा यांनी दिली आहे.

4:48 -विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार पत्रकार परिषदेत म्हणाले, १३ आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यांपैकी फक्त ५ आमदारांचे राजीनामे वैध आहेत. मी घटनेनुसार काम करत आहे. ६ जुलैला १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत मी कार्यालयात उपस्थित होतो. परंतु, त्यावेळी मला कोणीही दिसले नाही. मी गेल्यानंतर १३ आमदारांनी कार्यालयात राजीनामे जमा केले. यापैकी ८ आमदारांचे राजीनामे नियमानुसार नाहीत. आम्ही त्यांना नोटीस पाठवली आहे. तर, ५ आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यावर कारवाई सुरू आहे.

4:21 -मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची देवनहळ्ळी येथील रिसॉर्टमध्ये जेडीएस आमदारांसोबत गुप्त बैठक झाल्याच्या चर्चा. आज दीड वाजण्याच्या सुमारास रिसॉर्टमध्ये आमदारांसोबत २ तासांपेक्षा जास्त वेळ बैठक झाल्याची माहिती.

4:02- आमदारांचे राजीनामे स्वीकारण्यास उशीर होत असल्याच्या कारणामुळे भाजप कमिटी विधानसभा सभापती रमेशकुमार यांची भेट घेणार. बी एस येडियुरप्पा यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला निर्णय. माजी सभापती केजी बोपय्या, अरविंद लिंबावेली, मधुस्वामी, गोविंदा कारजोला आणि आर. अशोक यांची कमिटी घेणार सभापतींची भेट

3:23 -१३ आमदारांनी सोपवलेल्या राजीनाम्यांपैकी ८ आमदारांचे राजीनामे घटनाबाह्य. आनंद सिंह, नारायण गौडा, रामालिंगा रेड्डी, गोपाल्य आणि प्रताप गौडा पाटील यांचेच राजीनामे घटनेनुसार असल्याने त्यांना ट्रायलसाठी नोटीस मिळाली आहे.

02:56 -कर्नाटक विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी राज्यपालांना पत्र लिहिले आहे. यामध्ये बंडखोर नेत्यांपैकी कोणीही आपल्याला भेटले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, संवैधानिक निकष पाळू, असा विश्वास दिला आहे. '१३ राजीनाम्यांपैकी ८ बेकायदेशीर आहेत. मी त्यांना माझ्यासमोर उपस्थित होण्याचा वेळ दिला होता,' असे या पत्रात लिहिले आहे. राज्यपालांनी कर्नाटकातील राजकीय पेचप्रसंगाविषयी केंद्र सरकारला माहिती दिली आहे.

01:24 -'आम्ही अजूनही काँग्रेस पक्षातच आहोत. केवळ आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आम्हाला कोणतेही मंत्रिपद नको आहे. कर्नाटकातील लोकांना आघाडी सरकार मान्य नाही. आम्हाला काँग्रेस नेत्यांकडून अध्यक्षांना अपात्रतेची शिफारस होण्याविषयीही चिंता नाही,' असे काँग्रेस नेते एस. टी. सोमशेखर यांनी मुंबई येथे म्हटले आहे.

12:59 -सिद्धरामय्या, काँग्रेस - 'आम्ही अध्यक्षांना पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करण्याची विनंती करत आहोत. आम्ही त्या आमदारांना केवळ अपात्र ठरवण्याची नाही तर, त्यांच्यावर ६ वर्षे निवडणूक लढवण्याची बंदी घालावी, अशी मागणी करत आहोत. याविषयीचे पत्रही अध्यक्षांना लिहिले आहे.'

12:34 -काँग्रेसमधून नुकतेच निलंबित करण्यात आलेल्या रोशन बेग यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्त केला.

12:20 -सिद्धरामय्यांनी बंडखोर आमदारांना पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई करण्याचा दिला इशारा. आर्टिकल १६४ (१बी) संवैधानिक कायद्यांतर्गत पक्षांतर केलेल्या आमदारांना अपात्र ठरवले जाऊ शकते.

12:10 -काँग्रेसच्या आमदारांशी बैठक झाल्यानंतर सिद्धरामय्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी कर्नाटकातील राजकारणात उलथापालथ घडवून आणण्यासाठी भाजपला जबाबदार ठरवले आहे.

11:06 -सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली विधान सौधा येथे काँग्रेस आमदारांची बैठक सुरू झाली. उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर, राज्य काँग्रेस प्रभारी वेणुगोपाल, ईश्वर खांद्रे, प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडुराव आणि बहुतेक आमदार उपस्थित होते.

10:58 - काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार दिल्लीतून परतले. सूत्रांकडून ते मुंबईला जाण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली होती. मात्र, ते दिल्लीहून थेट बंगळुरुला आले.

10:52 -राजकीय नाट्यामुळे थकलेल्या देवेगौडांचे देवदर्शन. बंगळुरु येथील 'ईश्वरा टेम्पल' येथे जात मुलाची राजकीय कारकीर्द वाचवण्यासाठी केली प्रार्थना.

10:48 -विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी सर्व राजीनाम्यांवर कायद्यानुसार प्रक्रिया केली जाणार असल्याचे सांगितले. बंडखोर नेत्यांच्या राजीनाम्यांवर कायदा आणि संविधानानुसार निर्णय घेण्यात येईल. कुमार विधानसभेकडे रवाना.

10:48 - अध्यक्ष कुमार त्यांच्या सचिवांकडे देण्यात आलेले राजीनामे स्वीकारण्याची शक्यता दिसत नाही. राजीनामा दिलेल्या सर्व आमदारांना त्यांच्यासमोर हजर होण्याचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे.

10:45 - आतापासून एका तासानंतर विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार १३ काँग्रेस आणि जेडीएस आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यांची छाननी करतील.

10:40 - के. सी. वेणुगोपाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडुराव यांच्यासह विधानसभेत पोहोचले. 'मी रामलिंग रेड्डी यांच्याशी बोललो आहे. ते सच्चे काँग्रेस कार्यकर्ते आहेत. ते पक्ष सोडणार नाहीत. किती आमदारांनी राजीनामे दिले, ते मी मोजत बसलो नाही,' असे वेणुगोपाल म्हणाले.

10:30 -मुख्यमंत्री कुमारस्वामी देवेगौडांच्या निवासस्थानाहून ताज वेस्टएन्ड हॉटेलकडे आले. हॉटेलभोवती कडक सुरक्षाव्यवस्था.

10:23 -काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडुराव यांनी कुमार कृपा गेस्ट हाऊस येथे पत्रकारांशी संवाद साधला. 'सरकार कोणत्याही कारणासाठी विसर्जित केले जाणार नाही. काँग्रेस आणि जेडीएसचे आघाडी सरकारच कायम राहील. भाजप लोकशाहीची कत्तल करू पाहात आहे. त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांवरही निशाणा साधला.

09:59 -विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार त्यांच्या कार्यालयात आले. सर्वांमध्ये पुढील घडामोडींची उत्सुकता

09:52 -भाजप नेत्यांचे बी. एस. येदियुराप्पा यांच्या निवासस्थानी आगमन. माजी विधानसभा अध्यक्ष बोपाय यांचीही माजी मुख्यमंत्र्यांशी भेट. भाजप नेते मुरुगेश निराणी, उमेश कट्टी, जे. सी. मधुस्वामी, के. रत्नप्रभा येदियुराप्पांच्या निवासस्थानी पोहोचल्या.

09:19 -मुख्यमंत्री कुमारस्वामी देवेगौडांच्या निवासस्थानी. ताज्या राजकीय घडामोडींवर चर्चा.

08:02 -आज कर्नाटक विधानसभेत काँग्रेसची अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे. विधान सभेत सकाळी साडेनऊला ज्येष्ठ नेते सिद्धरायमय्या यांच्या नेतृत्वाखाली आमदारांची बैठक होईल. पदांचा राजीनामा देऊन मुंबईला गेलेले बंडखोर आमदार या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत.

08:00 -सरकार वाचवण्यसाठी विशेष प्रयत्न करणारे डी. के. शिवकुमार काल रात्री दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे तेही या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे.

07:39 -आज असंतुष्ट असलेले काँग्रेस आमदार बी. नागेंद्र, सौम्या रेड्डी, श्रीनिवास गौडा, सुब्बारेड्डी, एमटीबी नागराज, शिरा सत्यनारायण आणि जेडीएसचे अश्विन कुमार आज विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांना भेटून राजीनामा देण्याची शक्यता आहे. आज रमेश कुमार यांचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे सत्ताधारी युतीचे भविष्य ठरणार आहे.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी हेही अमेरिकेचा खासगी दौरा अर्ध्यावर सोडून परतले. मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यासाठी काल सर्व काँग्रेस आणि जेडीएसच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले. राजीनामे दिलेल्या बंडखोर नेत्यांना परत येण्यास संधी मिळावी, म्हणून हा निर्णय घेण्यात आला. सध्या बंडखोर नेत्यांशी चर्चा करून त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपने या सर्व घटनाक्रमात आपला कुठेही सहभाग नसल्याचे म्हटले आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, कर्नाटकातील घडामोडींमध्ये भाजप लवकरच सक्रिय होईल, अशी चिन्हे आहेत.

Last Updated : Jul 9, 2019, 9:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details