बंगळुरू- कोरोना विषाणूच्या भारतातील रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. सोमवारी कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये एकाला, आणि पंजाबच्या अमृतसरमध्ये एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे भारतातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ४५ वर पोहोचली आहे.
कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. डी. के. सुधाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूची लागण झालेला हा रुग्ण अमेरिकेहून परतला आहे. यासोबतच, त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचेही त्यांनी सांगितले. हा रुग्ण एक मार्चला भारतात परतला होता. पाच मार्चच्या दरम्यान त्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली. आतापर्यंत हा व्यक्ती साधारणपणे २,६६६ लोकांच्या संपर्कात आल्याची माहिती मिळाली असून, त्या सर्वांना शोधून त्यांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहितीही सुधाकर यांनी दिली.
तर, पंजाबमध्ये आढळून आलेला रुग्ण हा इटलीहून अमृतसरला परतला आहे. चार मार्चला आपल्या दोन कुटुंबियांसोबत तो अमृतसरला आला होता, अशी माहिती पंजाबचे प्रधान सचिव (आरोग्य) अनुराग अग्गरवाल यांनी दिली. हा रुग्ण होशियारपूरचा रहिवासी असून, अमृतसर विमानतळावर तपासणीदरम्यान त्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्याला अमृतसरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर, त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते. सोमवारी त्यांचा अहवाल आल्यानंतर, त्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निश्चित झाले.
कर्नाटकमधील प्राथमिक शाळा, अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर..