बंगळुरु - कार अपघातात मृत्यू झालेल्या पत्नीचा पुतळा एका उद्योगपतीने नव्याने बांधलेल्या आलिशान बंगल्यात बसवला आहे. कर्नाटकातील हुबळी येथील श्रीनिवास मूर्ती या उद्योगपतीने पत्नीच्या विहरात घरात पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला. घराच्या उद्घाटनावेळी पाहुण्यांना या पुतळ्याने आश्चर्यचकित केले. घरात पाहुण्यांचा प्रवेश झाला की, पहिली नजर या पुतळ्यावर पडेल, अशा पद्धतीने पुतळा बसविण्यात आला आहे. हुबेहुब मानवी आकाराचा पुतळा असल्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले.
पत्नीचे स्वप्न केलं पूर्ण
स्वत:चा मोठा बंगला असावा, असे श्रीनिवास मूर्ती यांची पत्नी माधवीचे स्वप्न होते. मात्र, स्वप्न पूर्ण होण्याआधीच तीन वर्षांपूर्वी एका कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला. तिरुपतीला जात असताना त्यांची कार एका ट्रकला धडकली. या अपघातात त्यांच्या दोन मुली वाचल्या. मात्र, पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर श्रीनिवास यांनी पत्नीचे घराचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
नव्याने बांधलेल्या घरात हॉलमध्ये त्यांनी पत्नीचा गुलाबी साडीतील सोफ्यावर बसलेला पुतळा बसवला आहे. हा पुतळा सिलिकॉन व्हॅक्स पासून तयार करण्यात आला आहे. घराच्या उद्धाटनाला आलेल्या पाहुण्यांचे स्वागत या पुतळ्याद्वारे झाले. बंगळुरुमधील बोंबिमाने या कलाकाराने हा पुतळा तयार केला आहे.
मृत पत्नीचा नव्या घरात बसवला हुबेहुब पुतळा 'कोप्पल शहरात उष्ण वातावरण असल्याने मेनाच्या पुतळ्याऐवजी सिलिकॉन व्हॅक्सचा पुतळा बनविण्याची कल्पना मला कलाकाराने दिली. मेनाचा पुतळा शाबूत ठेवण्यासाठी सतत एअर कंडिशनर सुरु ठेवू शकत नव्हतो. त्यामुळे सिलिकॉनपासून पुतळा तयार करण्यात आला. माझ्या पत्नीला पुन्हा घरात पाहून खूप चांगल वाटत आहे', अशी भावना श्रीनिवास यांनी व्यक्त केली.
हा पुतळा बनविण्यास कलाकाराला एक वर्षांचा कालावधी लागला. दिर्घकाळ पुतळा राहण्यासाठी तो सिलिकॉन व्हॅक्स पासून बनविण्यात आला, असे मूर्ती यांनी सांगितले.
घर बनविण्यासाठी मूर्ती यांनी २५ आर्किटेक्टच्या भेटी घेतल्या. शेवटी पत्नीचा पुतळा घरात बसविण्याची कल्पना देणाऱ्या रंघन्नानवरम या आर्टिटेक्ट यांच्याकडून घर बांधून घेतले. घरामध्ये पत्नीचा पुतळा बसवण्याच्या कल्पनेने अनेक पाहुण्यांना प्रभावित केले.