बंगळुरु - 'मी एच. डी. कुमारस्वामी सरकारला असलेला माझा पाठिंबा आधीच काढून घेतला आहे. या पत्राद्वारे यापुढे आपण निमंत्रित केल्यास मी स्पष्टपणे भाजप सरकारला माझा पाठिंबा जाहीर करेन,' अशा आशयाचे पत्र लिहित कर्नाटकचे अपक्ष आमदार एच. नागेश यांनी राज्यपाल वजूभाई वाला यांच्यासमोर मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला आहे. यामुळे 'आघाडीला लागलेली महागळती थांबेना,' अशी कर्नाटक सरकारची स्थिती झाली आहे.
'महागळती' थांबेना, कर्नाटकचे अपक्ष आमदार नागेश यांचा मंत्रिपदाचा राजीनामा
कर्नाटकचे अपक्ष आमदार एच. नागेश यांनी राज्यपाल वजूभाई वाला यांच्यासमोर मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला आहे. यामुळे 'आघाडीला लागलेली महागळती थांबेना,' अशी कर्नाटक सरकारची स्थिती झाली आहे.
आर. शंकर आणि एच. नागेश या अपक्ष आमदारांना नुकतेच मंत्रिपद देण्यात आले होते. मंत्रिपद मिळाल्यापासून एका महिन्याआधीच नागेश यांनी राजीनामा दिला आहे.
नागेश यांनी राज्यपाल वजूभाई वाला यांना पाठोपाठ २ पत्रे लिहिली आहेत. एका पत्रात त्यांनी एच. डी. कुमारस्वामी सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे म्हटले आहे. तर, दुसऱ्यामध्ये भाजप सरकार स्थापन करू इच्छित असल्यास भाजपला पाठिंबा देण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे. ते मुलबागल मतदारसंघातून अनुसूचित जातीसाठी आरक्षित जागेवर निवडून आले होते.