बंगळुरू - कर्नाटक उच्च न्यायालयाने काल (बुधवार) वादग्रस्त स्वयंघोषित स्वामी नित्यानंद याचा जामीन रद्द केला आहे. 2010 ला दोन मुलींनी अपहरण करून अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर केला होता. त्याप्रकरणी जामीन मंजूर झाल्यानंतर तो भारतामधून फरार झाला होता.
नित्यानंदचा चालक म्हणून काम केलेल्या कुरूप्पन लेनिन या व्यक्तीने सर्वप्रथम पोलिसांमध्ये नित्यानंदविरोधात तक्रार दाखल केली होती. नित्यानंद हा वारंवार सुनावणीसाठी गैरहजर राहत असल्याचे सांगत लेनिन यांनीच उच्च न्यायालयात त्याचा जामीन रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. यावर निर्णय देत, न्यायमूर्ती जॉन मायकल डीकुन्हा यांनी नित्यानंदचा जामीन रद्द करत, ट्रायल कोर्टला त्याच्या अटकेचे आदेश देण्यास सांगितले. तसेच, नित्यानंदचे हमीपत्र आणि बाँड्स जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिले.