बागलकोट -कर्नाटकातील अलमट्टी धरणातून अखेर आज 4 लाख 80 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावर राज्य सरकारने कर्नाटक सरकारला अलमट्टीचा विसर्ग वाढविण्याची विनंती केली होती. त्यानंतर कर्नाटक सरकारने हा निर्णय घेत आज पाण्याचा विसर्ग वाढविला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री, बीएस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अलमट्टी धरणामधून पाण्याचा विसर्ग 4 लाख 80 हजार क्युसेक केला असल्याची माहिती टि्वट करून दिली आहे.
सांगली-कोल्हापूर सध्या महापुराच्या कचाट्यात अडकले आहे. कृष्णा, वारणा आणि पंचगंगा तीनही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाण्याची पातळी कमी होत नसल्याने लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान, या पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढविण्याची विनंती केली होती.
कर्नाटकातही पुराने थैमान घातले आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये हवाई दलातर्फे बचावकार्य सुरू आहे. छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यामध्ये १५ लोकांना पूराच्या पाण्यातून वाचवण्यात आले आहे. कोची विमान तळावर पाणी साठल्याने विमान सेवा रविवारपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे.
अलमट्टी धरण हे उत्तर कर्नाटकात कृष्णा नदीवर बांधलेले विशाल धरण आहे. धरणाची भिंत विजापूर जिल्ह्यात असून पाण्याचा साठा बागलकोट जिल्ह्यात पसरला आहे. धरणाचे बांधकाम इ.स. 2005 साली पूर्ण झाले. अलमट्टी धरणाच्या भिंतीची लांबी 1565 मीटर आणि उंची 524 मीटर आहे. धरणात 524 मीटरपर्यंत पाणी असल्यास तो साठा 200 टीएमसी, आणि 519 मीटरपर्यंत पाणी भरल्यास तो साठा 123 टीएमसी होतो.