बंगळुरू - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी यलाहंका पुलाचे नाव बदलण्याचा निर्णय सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी केली. राज्यातील भाजप सरकारने या पुलाला विनायक दामोदर सावरकरांचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता.
यलाहंका पुलाला सावरकरांचे नाव देणे, म्हणजे देशाच्या प्रगतीसाठी झगडणाऱ्या लोकांसाठी नामुष्कीची गोष्ट आहे, अशा आशयाचे ट्विट कुमारस्वामी यांनी केले आहे. यामुळे राज्य सरकारचे नाव खराब होत असल्याचेही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
आपल्या देशाच्या प्रगतीसाठी स्वातंत्र्यापूर्वी, आणि स्वातंत्र्यानंतरही अनेक लोकांनी काम केले आहे. यांपैकी एखाद्या व्यक्तीचे नाव या पुलाला देणे योग्य ठरले असते. आपल्या राज्यातील अशा देशभक्तांची नावे इतर राज्यातील पुलांना दिली जातात का? आपल्या राज्यातील लोकांच्या वतीने मी राज्य सरकारला अशी विनंती करतो, की त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा, असे कुमारस्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
मागील वर्षी झालेल्या बीबीएमपी परिषदेच्या बैठकीमध्ये या नव्याने बांधण्यात आलेल्या यलाहंका पुलाला सावरकरांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानंतर तो राज्य सरकारकडे पारित करण्यासाठी पाठवण्यात आला होता. उद्या (गुरूवारी) या पुलाचे अनावरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा :'उत्तर प्रदेश सरकारला मजूरांचे संविधानिक हक्क काढून घ्यायचे आहेत का?'