बंगळुरु - कर्नाटक सरकारने इयत्ता पहिली ते दहावीच्या अभ्यासक्रमातून इस्लाम, ख्रिश्चन, टिपू सुलतान आणि त्याचे वडील हैदर अली यांचे अध्याय वगळण्याचा निर्णय स्थगित केला आहे. विरोधकांनी जोरदार निषेध दर्शवल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
कोरोना साथीचे कारण देऊन, राज्य सरकारने 18 व्या शतकातील म्हैसूरचे शासक टिपू सुलतान आणि त्याचे वडील हैदर अली खान यांच्या बाबतचे अध्याय इयत्ता सातवीच्या सामाजिक शास्त्र विषयाच्या अभ्यासक्रामातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, या निर्णयाचा राज्यात प्रचंड विरोध झाल्यामुळे सरकारला हा निर्णय स्थगित करणे भाग पडले आहे.
इयत्ता सातवीच्या अभ्यासक्रमात हैदर अली आणि टीपू सुलतान यांच्या अध्यायांचा समावेश होता. परंतु, वेबसाइटवर अपलोड केलेल्या नवीन अभ्यासक्रमातून दोन्ही अध्याय गायब झाल्याची बातमी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर विरोधकांनी या गोष्टीचा निषेध नोंदवला होता.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभ्यासक्रमातून 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता एकूण 120 दिवसांच्या नियमनानुसार नवीन अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आली आहे.
दरम्यान, कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारकडून टिपू सुलतान यांचा धडा वगळण्याविषयी भाष्य करण्यात आले होते. त्यानंतर मोठा वादही झाला होता.