शिमोगा (कर्नाटक) – ह्रदयविकाराचा त्रास असलेली एक पाच वर्षांची चिमुरडी तब्बल एक महिन्यानंतर रुग्णालयातून आपल्या घरी परतली. मुलीला घरी आल्याचे पाहून कासावीस झालेल्या आईचा जीव भांड्यात पडला. लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या आपल्या मुलीला घरी आणण्यासाठी तिच्या आईने प्रशासनाकडे आग्रह धरला होता. बंगळुरू जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने परतलेल्या मुलीला पाहून मायलेकीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
पाच वर्षीय दर्शनी ह्रदयविकाराच्या आजाराने त्रस्त आहे. देशभर लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी नियमित तपासणीसाठी ती पालकांसोबत शिमोगा येथून बंगळुरू येथे रुग्णालयात गेली होती. त्यानंतर वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसला पायबंद घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभर लॉकडाऊन घोषित करून संचारबंदी लागू केली. यामुळे दर्शनी सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाणाऱ्या शहरात नातेवाईकांसोबत अडकून पडली.