बंगळुरू : कर्नाटक सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह अन्य राज्यातून येणाऱ्या नागरिकांना अलगीकरणाच्या निकषांमध्ये बदल केला आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये येणाऱ्या नागरिकांना सात दिवसांच्या संस्थात्मक अलगीकरणातील कालावधीला समाप्त करत १४ दिवसांच्या होम क्वारंटाईनच्या नियमाला लागू केले आहे.
आतापर्यंत महाराष्ट्रातून येणाऱ्यांना सात दिवस संस्थात्मक अलगीकरणात ठेवले जात होते. तर, त्यानंतर सात दिवस होम क्वारंटाईन राहावे लागत होते. मात्र, आता यामध्ये बदल करण्यात आला आहे. याबाबत महसूल विभागाचे प्रधान सचिव (आपत्ती व्यवस्थापन) आणि राज्य सचिव कार्यकारी समिती एन. मंजूनाथ प्रसाद यांनी सांगितले, "महाराष्ट्रासह अन्य राज्यातून कर्नाटकमध्ये येणाऱ्या नागरिकांना आता १४ दिवसांच्या होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे.'' हे नियम यापूर्वी आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने जारी केलेल्या आदेश आणि मानक कार्यपद्धतीमध्ये निर्दिष्ट केलेल्या इतर अटीनुसार पुढील आदेश येईपर्यंत लागू राहतील, असेही ते म्हणाले.