कर्नाटकातील राजकीय पेच 'पावसाळ्या'सारखा - काँग्रेस नेते महेंद्र सिंघी - bjp mlc
'जे नाराज आहेत, त्यांच्याशी बोलणे आमचे कर्तव्य आहे. मी केवळ रमेश झारकीहोली यांची भेट घेतली. इतर कोणाला भेटलो नाही. हा केवळ कौटुंबिक वाद आहे. तो आमचा-आम्ही सोडवू. अशा बाबी पावसाळ्यासारख्या असतात. जो येतो आणि जातो,' असे सिंघी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

मुंबई - सध्याचा कर्नाटकातील आघाडी सरकारमध्ये उद्भवलेला राजकीय पेचप्रसंग हा केवळ कौटुंबिक वाद आहे. तसेच, तो पावसाळ्यासारखा आहे. जसा आला तसा जाईल. सिंघी यांनी राजीनामा दिलेले काँग्रेसचे आमदार रमेश झारकीहोली यांनी मुंबईतील सोफीटेल हॉटेलमध्ये भेट घेतली. त्यानंतर त्यांनी १३ महिने पूर्ण केलेले काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार व्यवस्थित असून काळजीचे कारण नसल्याचे म्हटले आहे.
'जे नाराज आहेत, त्यांच्याशी बोलणे आमचे कर्तव्य आहे. याविषयी मी चर्चा केली आहे. मी केवळ रमेश झारकीहोली यांची भेट घेतली. इतर कोणाला भेटलो नाही. हा केवळ कौटुंबिक वाद आहे. तो आमचा-आम्ही सोडवू. अशा बाबी पावसाळ्यासारख्या असतात. जो येतो आणि जातो,' असे सिंघी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
सध्या कर्नाटकचे नाराज आमदार राहात असलेल्या हॉटेलबाहेर भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनाही पाहण्यात आले. लाड यांच्यावर सध्या पक्षाच्या उमेदवार नोंदणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांना कर्नाटकातील बंडखोर आमदारांविषयी विचारले असता त्यांनी काही माहिती नसल्याचे सांगितले.
'सध्या कर्नाटकातील राजकीय स्थिती अस्थिर बनली आहे. मात्र, मला याविषयी माध्यमांद्वारेच माहिती मिळाली. दूरचित्रवाणीवरच मी याविषयी पाहिले. मी सध्या पक्षाच्या उमेदवार नोंदणीमध्ये व्यग्र असून मला याविषयी अधिक माहिती नाही,' असे लाड यांनी सांगितले.
कालच (शनिवार) भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ११ आमदारांनी राजीनामा देण्यामागे सिद्धरामय्या यांचा हात असल्याचे म्हटले होते. तर काँग्रेस आणि आणि जेडीएसकडून हा सर्व भाजपच्या 'ऑपरेशन कमळ'चा प्रभाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, काँग्रेस-जेडीएसच्या ११ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे सोपवले आहेत. त्यामुळे कर्नाटकातील आघाडी सरकार अस्थिर बनले आहे. राजीनामा देणाऱ्यांपैकी जेडीएसचे आमदार एच. विश्वनाथ यांनी एकूण १४ आमदारांनी राजीनामा दिल्याचा दावा केला आहे. मात्र, विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी अद्याप कोणताही राजीनामा संमत केलेला नाही. राजीनामा दिलेल्यांपैकी १० आमदार सध्या मुंबईत सोफीटेल हॉटेलमध्ये आहेत.