बंगळुरू : कर्नाटक काँग्रेसचे लोकसभा खासदार डी. के. सुरेश यांनी आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे मंगळवारी जाहीर केले. आपल्याला कोणतीही लक्षणे दिसून येत नसली, तरी खबरदारी म्हणून आपण विलगीकरणात जात असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, राज्यातील काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि त्यांचे भाऊ डी. के. सुरेश यांच्या घरावर सोमवारी सीबीआयने छापे मारले होते.
मंगळवारी आपला कोरोना अहवाल प्राप्त झाल्यानंतर, पॉझिटिव्ह असल्याचे सांगत सुरेश यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सोमवारी आपल्या घरावर छापा मारण्यासाठी आलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांनीही कोरोना चाचणी करुन घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच, या कारवाईच्या बातमीसाठी आलेल्या माध्यम प्रतिनिधी आणि पत्रकारांनीही आपली चाचणी करुन घ्यावी, असेही सुरेश म्हणाले.