बंगळुरू -कुमारस्वामी यांनी आम्हाला पाठिंबा दिला किंवा नाही दिला, तरी त्याने फरक पडत नाही. या निवडणुकांमध्ये आमचा अजेंडा फक्त 'त्या' अपात्र उमेदवारांना हरवणे आहे, असे वक्तव्य काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी केले आहे.
जनता दल (धर्मनिरपेक्ष) हे भाजपला समर्थन देईल का हा यावेळी चर्चा करण्याइतका महत्त्वाचा विषय नाही. ११३ ही संख्या गाठून आपले सरकार टिकवण्यासाठी भाजपला आणखी आठ जागा जिंकणे आवश्यक आहे, असेही सिद्धरामय्या म्हणाले.
कर्नाटकमध्ये याआधी निवडून आलेले काँग्रेस-जेडीएस सरकार हे १७ आमदारांच्या राजीनाम्यामुळे, अवघ्या तेरा महिन्यातच कोसळले होते. बहुमताअभावी कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते. कर्नाटक विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष आर. के. रमेश कुमार यांनी १७ आमदारांना अपात्र ठरवले होते. त्यानंतर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने ते आमदार पोटनिवडणूक लढू शकतात असा निर्णय दिल्यानंतर त्या सर्व आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता ते सर्व आमदार भाजपकडून निवडणूक लढणार आहेत.
१५ जागांवरती होणाऱ्या या निवडणुकांमध्ये भाजप, काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) हे वेगवेगळे लढणार आहेत. त्यामुळे कर्नाटकमध्ये तिहेरी लढत होणार आहे. या पोटनिवडणुकांसाठी कर्नाटकात ५ डिसेंबरला मतदान होईल, तर ९ डिसेंबरला मतमोजणी असणार आहे.
हेही वाचा :कर्नाटक पोटनिवडणूक : १२८ अपक्षांसह २४८ उमेदवार रिंगणात