नवी दिल्ली -बिहार विधानसभा निवडणुकांमुळे इतर बऱ्याच राज्यांतील पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या जोरदार पराभवामुळे पुन्हा एकदा पक्षात संताप निर्माण झाला आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पुन्हा पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. याआधी, सिब्बल हे 23 नेत्यांपैकी एक होते, ज्यांनी पक्षात सर्वसमावेशक सुधारणा करण्याची मागणी करणारे पत्र लिहिले होते.
पक्षामध्ये पक्षाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी पक्षात कोणताही मंच नसल्यामुळे हे जाहीरपणे बोलण्यास भाग पडत असल्याचे सिब्बल यांनी सांगितले. निवडणुका व्यवस्थापन करण्यासाठी कॉंग्रेसला कुशल व ज्येष्ठ नेत्यांची गरज आहे, असे ते म्हणाले.
सिब्बल यांचे हे विधान बिहार विधानसभा आणि विविध राज्यांमधील पोटनिवडणूकांमधील पक्षाच्या निराशाजनक कामगिरीनंतर समोर आले आहे. या निवडणुकीनंतर सिब्बल यांची भूमिका हा राहुल गांधींवर आणखी एक हल्ला समजण्यात येत आहे.
बिहारच्या निकालावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपैकी कुणीही बोलले नाही, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा -बिहारच्या मंत्रिमंडळाचे नितीश कुमार यांच्याकडून खातेवाटप; गृह विभागाची भाजपकडून मागणी
बिहारच्या निकालानंतर बरेच कॉंग्रेस नेत्यांनी आपली बाजू मांडली आहे. कारण, विरोधी पक्षाच्या महाआघाडीतील कॉंग्रेस हा सर्वात कमकुवत पक्ष असल्याचे सिद्ध झाले आहे. कॉंग्रेसने राज्यात 70 जागा लढवल्या, परंतु त्यांना केवळ 19 जागा जिंकता आल्या. पोटनिवडणुकांमध्येही भारतीय जनता पक्षाशी (भाजपा) जेथे कॉंग्रेसचा थेट सामना झाला, तेथे त्यांना पराभवच पत्करावा लागला.
सिब्बल म्हणाले की, पक्षाने ही उतारकळा आहे, हे आधी मान्य करावे लागेल आणि स्वतःला बळकट करण्यासाठी संघटनात्मक पुनर्रचना व मीडिया व्यवस्थापन अशा विविध पद्धती अवलंबण्याची गरज आहे.
अधिक पुढाकार घेणारे व अनेक बाबी पुढे नेण्याची जबाबदारी खंबीरपणे उचलणारे विचारशील नेतृत्व पक्षाला आवश्यक आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. 'पक्षामध्ये चर्चा करण्यासाठी अधिक अनुभवी लोक आहेत. जे सध्याची राजकीय स्थिती समजू शकतात आणि लोकांपर्यंत पोहोचून कार्य करू शकतात,' असेही कॉंग्रेस नेते सिब्बल म्हणाले.
कपिल सिब्बल यांच्यासह 22 कॉंग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षात मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याची मागणी केली होती.
हेही वाचा -जाणून घ्या.. नितीश कुमार यांचा इंजिनियरिंग ते राजकारणापर्यंतचा प्रवास!