नवी दिल्ली - महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट योग्यच असल्याचे काल (बुधवारी) अमित शाह म्हणाले होते. यावरून काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. राजकीय पक्ष तोडण्यात आणि जोडण्यात अमित शाह चांगलेच अनुभवी आहेत, त्यांचा यामध्ये मोठा अनुभव आहे, याचे नमुने आपण गोवा आणि कर्नाटक राज्यात पाहिले आहेत, अशी टीका सिब्बल यांनी केली.
महाराष्ट्रातील सत्तेच्या पेचाबाबत पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी काल मौन सोडले. सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी सर्वांना पुरेसा वेळ दिला गेला होता. आमच्यासह शिवसेना किंवा काँग्रेस-राष्ट्रवादीही सत्तास्थापनेसाठी दावा करण्यात असमर्थ ठरली. याआधी कोणत्याही राज्याला सरकार स्थापनेसाठी १८ दिवसांइतकी मुदत दिली गेली नव्हती. त्यामुळे, महाराष्ट्रात लागू झालेली राष्ट्रपती राजवट ही योग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त होते होते, या वक्तव्याच्या समाचार सिब्बल यांनी घेतला.