नवी दिल्ली -कोरोना संकट काळातही केंद्र सरकारवर काँग्रेस नेते राहुल गांधी टीका करत असल्यावरून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यांच्यावर टीका केली होती. मात्र, राहुल गांधी यांच्या मदतीला ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल धावून आले. जावडेकर यांनी खऱ्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवे, कारण त्यांना सरकार कसं चालवायचं माहित नाही, असे उत्तर सिब्बल यांनी जावडेकर यांना दिले.
जावडेकर राहुल गांधींवर टीका करताना म्हणाले होते, 'राहुल गांधी रोज ट्विट करत आहेत. काँग्रेस पक्ष आता फक्त ट्विट करण्यापुरताच राहिला आहे. काँग्रेस सरकार काम करत नाही, हे अनेक राज्यातून दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष निराश झाला असून काहीही करुन केंद्र सरकारवर टीका करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्यांना यश येणार नाही'.
पर्यावरण मंत्री असतानाही तुम्ही राजकारणात एवढं प्रदूषण का आणता? तु्म्ही हे प्रदूषण दुर करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. मात्र, तुमच्या प्रत्येक वक्तव्यात टीका असेत. सध्या आपला देश अभुतपूर्व संकटात आहे. राहुल गांधींवर टीका करण्यापेक्षा या संकटांचा सामना करा, असे उत्तर कपिल सिब्बल यांनी प्रकाश जावडेकरांना दिले.
जावडेकर यांनी माध्यमांशी बोलताना शाहीन बाग आंदोलनाचा उल्लेखही केला होता. त्यालाही सिब्बल यांनी उत्तर दिले. शाहीन बागेबद्दलचं जास्त ज्ञान तुमच्याकडं असावं, कारण जी दिल्ली पोलीस तुमच्या सरकारच्या नियंत्रणात आहे, ते या भागात सीसीटीव्ही फोडताना सापडले. सध्या उच्च न्यायालयात यासबंधी अनेक याचिक पडलेल्या आहेत. या प्रकरणाची नीट चौकशी होत नाही. कारण काही लोकांनीच ही दंगल भडकावली, असे सिब्बल म्हणाले.
सिब्बल यांनी पंतप्रधान मोदींनाही टोला लगावला. देशभरात कोरोना नियंत्रणात आणताना पहिल्यांदा लॉकडाऊन जाहीर करण्यावेळी पंतप्रधान मोदींनी महाभारताचे उदाहरण दिले होते.' पंतप्रधान म्हणाले होते, महाभारत युद्ध 18 दिवसांत संपले होते. त्यासारखंच कोरोना विरोधातील युद्ध आपण 21 दिवसांत जिंकू. मला असं वाटतयं 21 दिवस अजून संपलेले नाहीत. त्यामुळे खऱ्या प्रश्नांकडे लक्ष केंद्रित करा, असा माझा सल्ला सरकारला आहे, असे सिब्बल म्हणाले.