पाटणा -बिहारच्या माहाआघाडीने मागील अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेली जागावाटपाची यादी शुक्रवारी जाहीर केली. मात्र, या यादीमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाला (भाकप) एकही जागा देण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थी नेता कन्हैया कुमार महाआघाडीत नाही हे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यानंतर कन्हैया कुमार बेगुसरायमधून लोकसभा निवडणूक लढवणार, असे म्हटले जात आहे.
महाआघाडीमध्ये जागावाटप झाल्यानंतर भाकपने रविवारी बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये भाकप उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) माजी विद्यार्थी संघचा प्रमुख कन्हैया कुमारची उमेदवारीही जाहीर होऊ शकते.
कन्हैया कुमार बिहारच्या बेगुसराय येथून निवडणूक लढवणार हे आधीच जाहीर झाले होते. मात्र, महाआघाडीमध्ये भाकप असणार का यावर प्रश्नचिन्ह लागले होते. शेवटी महाआघाडीने जागावाटप जाहीर केल्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट झाले. रविवारी होणाऱ्या बैठकीमध्ये मधुबनी, मोतीहारी, बांका आणि खगडिया या मतदार संघासाठी भाकप उमेदवार घोषित करणार आहे.
कन्हैया कुमार बेगुसराय येथून निवडणूक लढल्यास ही लढत त्रिकोणीय होण्याची शक्यता तयार झाली आहे. येथून भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. महाआघाडीतील पक्षांनी बिहारच्या ४० जागा वाटून घेतल्या आहेत. त्यामध्ये २० जागांवर राष्ट्रीय जनता दल तर ९ जागांवर काँग्रेस लढणार आहे.