लखनऊ - उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये शुक्रवारी भरदिवसा हिंदू समाज पक्षाचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. २ हल्लेखोरांनी ही हत्या केली. या प्रकरणी तिवारी यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून २ मौलानांवर प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आली आहे. या दोघांनी २०१६ मध्ये तिवारी यांना मारण्याची धमकी दिली होती, असे त्यांच्या पत्नीने सांगितले. मात्र, अद्याप कोणाला अटक केली नसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कमलेश तिवारी यांची त्यांच्या कार्यालयातच हत्या झाली. हत्येपूर्वी हल्लेखोरांनी तिवारी यांच्याशी अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर मिठाईच्या डब्यातून चाकू बाहेर काढला आणि गळा चिरून त्यांना ठार मारले. संभाषणादरम्यान कमलेश तिवारी यांनी दोघांनाही चहा पाजला होता. यावेळी त्यांनी सेवकाला मसाला आणि सिगारेट आण्यासाठी पाठवले. तो परत येईपर्यंत हल्लेखोर तिवारींना ठार मारून फरार झाले होते. तिवारी यांचे सेवक स्वराष्ट्रजीत सिंह यांनी पूर्ण घटनेची माहिती दिली.