भोपाळ -भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री उमा भारतींनी माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर जोरदार टीका केली. त्याच बरोबर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर स्तुतीसुमने उधळी आहेत. भारती यांनी आपल्या ट्विटरचा वापर करुन कमलनाथांवर टीका केली.
उमा भारतींनी एका दिवसभरात ट्विटचा धडाका लावत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. फक्त राजकीय चर्चा न करता त्यांनी काही कौंटुबिक गोष्टीही नेटकऱ्यांसमोर व्यक्त केल्या. जेव्हापासून कोरोनाचा धुमाकूळ सुरू झाला तेव्हापासून कुटुंबियासोबत वेळ घालवता आला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा -संतापजनक..! तपासणीसाठी गेलेल्या डाॅक्टरांवर इंदौरमध्ये दगडफेक
कोरोनाच्या संकटादरम्यानच शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कोरोना प्रभावामुळे मोठा सोहळा करता आला नाही, अत्यंत साधेपणाने शपथविधी करण्यात आला, असे भारती म्हणाल्या. कमलनाथ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी केंद्रात मंत्रीपदही भूषवले आहे मात्र, त्यांना आपला पक्ष आणि राज्यातील सरकार सांभाळता आले नाही, अशी टीका भारतींनी केली.
शिवराज सिंह यांनी १३ वर्ष सरकार सांभाळले आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपने दोनदा निवडणूक जिंकली आहे. कठीण प्रसंगांना तोंड देत सरकार चालवण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे, अशा शब्दांत उमा भारती यांनी मध्य प्रदेशच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांची स्तुती केली.
राजगड येथील थप्पड प्रकरण काँग्रेसला महागात पडले. त्यानंतर २० आमदारांनी दिलेले राजीनामे आणि सिंधियांचा भाजपमध्ये झालेला प्रवेश काँग्रेसला खुप मोठा धक्का आहे, असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, उमा भारती यांनी आपले एका महिन्याचे निवृत्ती वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देण्याची घोषणा केली. त्यांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली.