नवी दिल्ली -मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला कमलनाथ यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. वरिष्ठ वकील आणि काँग्रेसचे राज्यसभा खासदार विवेक तनखा यांनी याबाबत माहिती दिली. आम्ही कमलनाथ यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीची मागणी केली असल्याचेही ते म्हणाले. कमलनाथ यांनी सातत्याने निवडणूक आयोगाच्या नियमावलीचे उल्लंघन केले आहे, असे कारण देत आयोगाने ही कारवाई केली आहे.
मध्य प्रदेशात विधानसभेच्या २८ जागांसाठी पोटनिवडणुका होणार असून प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांचा 'स्टार' प्रचारकाचा दर्जा काढून घेतला आहे. कमलनाथ यांनी आचारसंहितेचे सतत उल्लंघन केल्याचे म्हणत आयोगाने ही कारवाई केली.