चेन्नई- 'इंडियन २' या सिनेमाच्या शूटींगदरम्यान झालेल्या अपघातात तीन लोकांचा मृत्यू झाला होता. या अपघातामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना, आणि जखमींना मदत म्हणून एकूण एक कोटी रुपये देणार असल्याची घोषणा अभिनेते कमल हासन यांनी केली आहे. जर आपण काही क्षणांपूर्वी तिथून बाजूला गेलो नसतो, तर कदाचित या अपघातामध्ये आपला प्राणही गेला असता, असे त्यांनी यावेळी सांगितले.
बुधवारी रात्री क्रेन कोसळून झालेल्या अपघातात ९ जण गंभीर जखमी झाले होते. यातील तिघांचा या अपघातात मृत्यू झाला. याबाबत क्रेन चालकावर विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये निष्काळजीपणामुळे मृत्यू बाबतही कलम लावण्यात आले आहे. अपघातात मृत पावलेल्यांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक कृष्णा, कला सहाय्यक चंद्रन आणि निर्मिती सहाय्यक मधू या तिघांचा समावेश आहे. कमल हासन आणि या सिनेमाची अभिनेत्री काजल अगरवाल यांनी या अपघाताबाबत शोक व्यक्त केला आहे.
कमल हासन म्हणाले, की अपघात हे त्सुनामीसारखे असतात. त्यांना कोण श्रीमंत, कोण गरीब याचे काही घेणे-देणे नसते. अपघात झाला त्याच्या चार सेकंदाआधीच चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कॅमेरामन तिथून बाजूला झाले होते. मीदेखील अभिनेत्रीसह तिथेच होतो. मी तिथून जरादेखील बाजूला उभा असतो, तर आज माझ्याजागी कोणीतरी दुसरे या अपघाताची माहिती देत असते. यावेळी बोलताना त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना मदत म्हणून एकूण एक कोटी रूपये देण्याची घोषणा केली.
काल झालेल्या या अपघात बळी गेलेल्यांबद्दल कमल हासनने ट्विट करत शोक व्यक्त केला होता. हासन यांनी ट्विटमध्ये म्हटले होते, ''मी आजवर अनेक अपघात पाहिले आहेत, परंतु हा सर्वात भयानक होता. मी तीन मित्रांना गमावलंय. माझ्यापेक्षा त्यांच्या कुटुंबीयांना जास्त दुःख झेलावं लागत आहे. त्यांच्याप्रति मनःपूर्वक सहानुभुती.''
हेही वाचा :केरळने जिंकली 'कोरोना'ची लढाई; राज्यातील तीनही रुग्णांवरील उपचार यशस्वी!