नवी दिल्ली - भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी त्यांच्यावरील लैंगिक शोषणाचे आरोप नाकारले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष पीठाकडून आज या प्रकरणावर सुनावणी घेतली जाणार आहे. एका महिलेने सरन्यायाधीश गोगोई यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. याविषयीचे सविस्तर वृत्त ४ वृत्तसंस्थांनी दिले होते.
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी हे आरोप नाकारले असून या आरोपांमुळे अत्यंत दुःख झाल्याचे म्हटले आहे. 'या आरोप करणाऱ्या महिलेमागे कोणती तरी मोठी शक्ती उभी आहे. न्यायव्यवस्थेला धमकावले जात आहे. न्यायव्यवस्थेला अत्यंत गंभीर धोका निर्माण झाला आहे. हे खालच्या पातळीचे कारस्थान आहे. मी अशा प्रकारच्या खालच्या पातळीच्या आरोपांना उत्तर देऊन स्वतः खालच्या पातळीवर उतरणे योग्य समजत नाही,' असे सरन्यायाधीश गोगोई यांनी म्हटले आहे.