नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १८ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यापूर्वी विरोधी पक्षांनी ईव्हीएमच्या पारदर्शकतेवर आक्षेप नोंदवत आगामी मतदान प्रक्रियेसाठी बॅलेट पेपर वापरण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. . त्यासाठी ६ विविध पक्षातील नेत्यांनी आज दिल्ली येथे पत्रकार परिषद घेतली. दरम्यान व्होटिंग मशीन विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेण्याचीही त्यांनी तयारी दर्शवली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया ७ एप्रिलला पार पडली. या मतदान प्रक्रियेत देशभरातील अनेक ठिकाणी व्होटिंग मशीनमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले होते. तर, काहींनी आपण दिलेली मते दुसऱ्याच पक्षाला जात आहेत, असे आरोप नोंदवले होते. तर, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ४ हजार ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर तब्बल ६ पक्षांनी एकत्र येऊन या घटनेचा विरोध केला आहे.